रिधोरे : तांदुळवाडी या.माढा येथील गणेश परबत यांच्या गावाजवळील शेतीत हिस्त्र प्राण्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
बार्शी येथील अमोल गायकवाड हे तांदुळवाडी-राहुलनगर(सुलतानपूर) रस्त्यावरून बहिणीच्या घरी निघाले होते.निमगाव (मा) येथील बहीण ज्योती सतीश कदम यांना घेऊन येण्यासाठी निघाले होते. दरम्यान,गणेश परबत यांच्या उसातून अचानक बिबट्यासदृश हिंस्त्र प्राणी पश्चिमेकडून-पूर्वेकडे रस्ता पार करत असताना दिसला.त्यांनी याबाबत तांदुळवाडी येथील शेतकरी संदीप शिंदे यांना याची माहिती दिली.
त्यांनी गावातील पोलीस पाटील, सरपंच रणजितसिंह पाटील यांना याबाबत तात्काळ माहिती दिली. यावेळी पोलीस नाईक विशाल पोरे,शशिकांत डोळे,अमोल बचुटे व पोलीस कॉन्स्टेबल मनोजकुमार शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.वपाहणी केली असता त्यांना प्राण्याच्या पायाचे उमटलेले ठसे आढळून आले त्यांनी तात्काळ वनविभागाचे अधिकारी सुनील कुर्ली यांच्याशी संपर्क साधून त्यांना ठशांचे फोटो पाठवले आणि माहिती दिली. यावेळी गावातील उपसरपंच किरण गवळी,संदीप शिंदे,गुलाब जाधव,पांडुरंग गवळी,गणेश परबत,सुरज परबत,तानाजी कदम,ज्ञानेश्वर गवळी,ज्ञानेश्वर माने,आशिष भोसले,अमोल गवळी आदी ग्रामस्थ उपस्थितीत होते.
प्राथमिक मिळालेल्या माहिती, फोटोवरून तो तरस असण्याची शक्यता आहे. मोहोळ वनक्षेत्रात अनेक ठिकाणी तरस आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घ्यावी. वनक्षेत्रात बिबट्याचाही वावर असून बिबट्या इकडून-तिकडे फिरत असल्याने शेतातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.