सोलापूर, – अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, वेतनवाढ, दरमहा पेन्शन यासह विविध मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देऊनही याची पूर्तता न झाल्याने अंगणवाडी महिला कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात करून सोमवार, २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.
गुरुवारी झालेल्या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्याची सर्व कर्तव्ये पार पाडताना कोरोना हटवण्यासाठी दिवस-रात्र कष्ट घेतले. पण त्यांच्या न्याय मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. महागाई दुपटीने वाढली पण मानधनात वाढ नाही, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ नाही, आहाराच्या दरात वाढ नाही, सेवा समाप्ती लाभ नाही, आजारपणाच्या रजा नाहीत, हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील गायब केल्या .
आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून नवीन मोबाइलसाठी आंदोलन करूनही मोबाइल दिलेला नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात अध्यक्षा पार्वती स्वामी, माया नष्टे, कल्पना कांबळे, वर्षा वेदपाठक, जया पंडित, प्रभावती शेडवाके, जित्ती मुलाणी, दंडाबाई बोराळे, संगीता आगलावे, उज्ज्वला क्षीरसागर आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या