बार्शी : शेतीच्या रस्त्यासाठी न्यायालयात दाखल केलेला दावा काढून घ्यावा म्हणून मकरंद मधुकर गादेकर (२२, रा. तांबेवाडी गादेकर वस्ती, शेंदरी, ता. बार्शी) यांच्यावर चिडून जाऊन लोखंडी गज आणि तलवारीने वार करून प्राणघातक हल्ला केला. एवढ्यावर न थांबता वृद्ध माता पित्यालाही मारहाण करून आईचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याच्या रिंगा पळवल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
२२ जून रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शेंदरी गावच्या परिसरात तांबेवाडी येथे शेतातील रस्त्यासाठी मकरंद गादेकर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो काढून घेण्यासाठी मकरंद यांच्यावर कुटुंबातील लोक चिडून होते. पोलिसांनी गोरख कोंडलिंगे, वैभव कोडलिंगे, वैष्णव कोडलिंगे, शीतल कोंडलिंगे सह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या मारहाणीत मकरंदला आईवडीलांसह गजाने मारहाण केली व आईच्या गळ्यातील ७० हजारांचे दागिने चोरून नेले. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार बुधवारी रात्री ९ वाजता घराबाहेर वडिलांसोबत चहा पीत बसले होते. गावच्या वस्तीशेजारी राहात असले वैष्णव कोंडलिंगे यांच्यासह काही लोक आले. शेतातील रस्त्यासाठी कोर्टात दावा करतोस काय? रस्ता तुझ्या बापाचा आहे का? म्हणत त्यांनी त्याला मारहाण करून खाली पाडले.
नरड्यावर पाय ठेवून जिवंत ठेवणार नाही म्हणत तलवारीने मारहाण केली. वडील सोडविण्यास येताच त्यांनाही मारहाण केली. त्यापाठोपाठ आईलाही घरातून ओढून आणून मारहाण करून जखमी केले. तसेच आईच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र, सोन्याच्या रिंगा चोरून नेल्या. जखमी अवस्थेत काही लोकांनी त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. अधीक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.