पंढरपूर : चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटा लगत असलेल्या घाटाची भिंत कोसळून सहा ते आठ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत होती. याबाबतची माहिती मिळताच प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये एकच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून दोन भाविकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
सुमारे एक वर्षांपासून चंद्रभागा नदीच्या तीरावरील घाटाचे काम सुरू होते. काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कुंभार घाटावरील भिंत कोसळली. या दुर्घटनेमुळे ढिगाऱ्याखाली सहा ते आठ जण अडकले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.
याबाबत येथील नागरिकांनी घाटाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.