मोहोळ : मोहोळ तालुक्यामध्ये कुरुल आणि मोहोळ येथे एकूण दोन ठिकाणी एटीएम मशीन फोडून एकूण ४९ लाख २७ हजार ५00 रुपयांची चोरी झाल्याची आणि १ लाख ५० हजाराचे मशीनचे नुकसान झाल्याची घटना घडली. यापैकी कुरुलमध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून २२ लाख ९९ हजार तर मोहोळमध्ये स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. कुरुल येथे पहाटेच्या वेळी चार अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळील एटीएम मशीन फोडल्याची तक्रार एटीएम मशीनचे रिजनल मॅनेजर अमोल अरुण पवार यांनी कामती पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुलमध्ये बँक ऑफ इंडिया शाखेच्या जवळ एटीएम केंद्र आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात युवकाने तोंडाला फडके बांधलेले अवस्थेत एटीएम केंद्रात प्रवेश करून आधी सीसीटीव्ही कॅमे-यावर रासायनिक हिरवा स्प्रे मारून ते बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बाहेर उभे असलेल्या तिघांपैकी एकाने बरोबर आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम केंद्रांच्या मशीनचा दरवाजा तोडून यातील २२ लाख ९९ हजार रुपयांची रोकड लांबवले.
याबाबत माहिती मिळाल्यावर सोलापूर येथील आयटी ऑफिसर अनिकेत पाठक यांनी इलेक्ट्रिक मॅनेजमेंट अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एटीएम देखभाल व दुरुस्ती करणारे अमोल पवार रिजनल मॅनेजर आणि त्यांचे साथीदार रवि इंजापुरी यांना फोनवरून कुरुलमधील एटीएम फोडल्याचे सांगितले. सोलापूरहून फिंगर प्रिंट एक्स्पर्ट व श्वानपथक त्या ठिकाणी गेले. तपासणीअंती २२ लाख ९९ हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत अमोल पवार यांच्या फिर्यादीवरून कामती पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवि कलम ४५७, ३८0, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास कामतीचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने करीत आहेत.
मोहोळमध्येही तोच प्रकार
एकीकडे कुरूलमध्ये एटीएम फोडून लाखोंची चोरी झालेली असतानाच दुसरीकडे त्याच काळात मोहोळ शहरातही दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला गेला. यात विजापूर रोडवरील लोकसेवा लॉजच्या पाठीमागे असलेले एटीएम मशीन फोडून चोरी करण्यात आली तर पंढरपूर रोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी एटीएम ऑपरेट करणा-या हिताची पेमेंट सर्व्हिसेस कंपनीने एटीएम यंत्रे बसविलेली आहेत. त्यात मोहोळमध्ये स्टेट बँकेचे एटीएम लोकसेवा लॉजच्या पाठीमागे आहे.
या एटीएम मशीनचा दरवाजा गॅस कटरच्या साह्याने कट करून २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. तर मशीनचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत हिताची पेमेंट सर्व्हिस कंपनीचे व्हेंडर ईश्वर म्हेत्रे आणि वरिष्ठ अधिकारी किरण लांडगे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिली आहे. एसबीआयच्या चॅनेल मॅनेजर स्मिता लोखंडे यांनी एटीएम मशीन मध्ये एकूण २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची एकूण रक्कम १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असल्याची माहिती दिली. मोहोळ मधील गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सुधीर खारगे हे करीत आहेत.