25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeसोलापूरदिग्गजांच्या साथीमुळे अवताडेंचा विजय

दिग्गजांच्या साथीमुळे अवताडेंचा विजय

एकमत ऑनलाईन

सोलापूर (संजय येऊलकर) : सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात समाधान आवताडे यांच्या रुपात कमळ फुलले. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवून राष्ट्रवादीने सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा हिशोब मांडला होता तर समाधान आवताडे यांच्यासारखा आर्थिकदृष्ट्या तगड्या उमेदवाराला मैदानात उतरवून भाजपने पंढपूरचा गड जिंकण्याचा मनसुबा रचला होता.

राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, बच्चू कडू, गुलाबराव पाटील, आमदार सुनील शेळके आदींनी सभा गाजवल्या. तर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राम सातपुते, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सभांचे फड गाजवले. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी या मतदारसंघात गावागावात व्यूहरचना आखून समाधान अवताडे यांना विजयापर्यंत नेले.

राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत झाली. सुरुवातीच्या काही फे-यांमध्ये आघाडी घेतलेले भगीरथ भालके यांची आघाडी तोडत अवताडेंनी जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. पंढरपूर मतदारसंघात एकूण १९ उमेदवार रिंगणात होते मात्र प्रमुख लढत भालके विरुद्ध अवताडे अशीच झाली.

मंगळवेढा संपूर्ण तालुका, पंढरपूर तालुक्यताील ३५ गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडी कडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारीची आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली. या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या तीन लाख चाळीस हजार ८८९ एवढी आहे. या निवडणुकीत ६५.७३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख २४ हजार ६८ मतदारांनी मतदान केले. मंगळवेढ्यातील १०४ गावे तर पंढरपूर तालुक्यातील ३५ गावे आणि पंढरपूर शहर असे निवडणुकीचे कार्यक्षेत्र आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात समाधान अवताडे यांना १ लाख ९ हजार ४५० मते पडली आहेत तर भगीरथ भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते पडली आहेत. ३७३३ मतांनी समाधान अवताडे यांनी अटीतटीच्या सामन्यात कमळ फुलवले आहे. समाधान अवताडे यांच्या विजयात आमदार प्रशांत परिचारक आणि पांडुरंग परिवाराचा मोठा वाटा असून पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला १०-१० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसला होता पण आमदार प्रशांत परिचारक यांनी उत्कृष्ट व्यूहरचना करत किल्ला लढवला. त्यामुळे राष्ट्रवादीला अपेक्षित मत येथून मिळाली नाहीत. या निवडणुकीत रिंगणातील इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमाज्ोणीला सुरुवात झाल्यापासून भाजपाचे समाधान अवताडे आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही काळानंतर अवताडे पिछाडीवर जातील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना होता परंतु शेवटपर्यंत अवताडे यांची आघाडी वाढतच गेली. ३८ व्या फेरीअखेर अवताडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. समाधान अवताडे यांच्या विजयामुळे पंढरपूर तालुक्यातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलणार आहेत.

आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्या पहिल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघात विजय मिळवताना जी व्यूहरचना आखली त्याच पद्धतीची मतदारांना आकर्षित करणारी वेगळी व्यूहरचना आखत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या ताब्यातून हिसकावून घेतला. आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द पूर्ण केला.

दीदी झाशीच्या राणीसारख्या लढल्या – छगन भुजबळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या