सांगोला : जागेच्या कारणावरून भाच्यासह मामा- मामींनी केलेल्या मारहाणीत दांपत्य जखमी झाले. भाच्याने लोखंडी पाइप पतीच्या जबड्यावर मारून जखमी केले. या मारहाणीत पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र कोठेतरी पडून गहाळ झाले.
सोमवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सांगोला तालुक्यात शिवणे येथे गणेशनगर इथे ही घटना घडली. याबाबत गणेश हरिदास देवकाते यांनी तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
शिवणे येथील गणेश देवकाते हे सोमवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास स्वतःच्या घरासमोर थांबले होते. दरम्यान, मामा संजय मायाप्पा जानकर, भाचा राहुल संजय जानकर आणि मामी आशाबाई संजय जानकर हे मिळून आले.
तुम्ही आमच्या जागेवरून निघून जावा, तुम्ही राहत असलेली जागा आमची आहे म्हणत त्यास शिवीगाळ, दमदाटी करू लागले. त्यावेळी गणेशने ही जागा आम्ही करार करून घेतली आहे. आम्ही जाणार नाही म्हणताच भाचा राहुल याने ट्रॅक्टरच्या रोटरला लावलेला लोखंडी पाइप काढून त्याच्या जबड्यावर मारून जखमी केले.
तसेच मामा, मामी यांनीही मारहाण केली. हे भांडण पत्नी सुनंदा ही सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी राहणारे भाऊसाहेब हजारे, अनिता हजारे यांनी सोडवासोडवी केली.