पंढरपूर : शेतजमिनीवर वारसदार म्हणून नोंद करून देण्यासाठी एका व्यक्तीला संगेवाडी (ता. पंढरपूर) येथील तलाठ्याने दोन हजार लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीद्वारे ती लाच फोन पे वर स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना बुधवारी घडली आहे.
मृत वडिलांची शेतजमिनीवर वारसदार म्हणून तक्रारदार, त्यांचा भाऊ व त्यांच्या आईचे नाव लागलेले आहे. या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी तहसील कार्यालय सांगोला येथून हक्कसोडपत्र तयार करून त्यांच्या वडिलांचे शेतजमिनीवर वारसदार म्हणून केवळ त्यांच्या आईचे नाव लागावे याकरिता विहीत अर्जासह हक्कसोडपत्र जोडून सज्जा संगेवाडी येथे अर्ज सादर केला होता.
या प्रकरणामध्ये तक्रारदार हे त्या अनुषंगाने पाठपुरावा करीत असताना तलाठी नारायण विठ्ठल खरात (वय ३६) यांना भेटले. त्यांनी तक्रारदार यांना हक्कसोड पत्रानुसार वारसदार म्हणून शेतजमिनीवर तक्रारदार यांच्या आईचे नाव लावण्याकरिता दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. ती लाच रक्कम खासगी व्यक्ती मयूर गुलचंद भोरे (वय २०, रा. संगेवाडी, ता. सांगोला) यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले होते.
या प्रकरणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान खरात यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले व भोरे यांनी ती लाच स्वीकरताना रंगेहात सापडले. यामुळे वरील दोघांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.