मंगळवेढा : सांगोला रोडवर लेंडवे चिंचाळे हद्दीत असणाऱ्या ज्ञानेश्वरी लॉजवर अवैधरीत्या सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर मंगळवेढा पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी अवैधरीत्या सुरू असलेल्या प्रकाराचा भंडाफोड करत पीडित महिलेसह एका तरुणाला अटक करण्यात आली.
लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याबद्दल पोलिस निरीक्षक रणजित माने यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहकास पोलिसांजवळील १२०० रुपये पंचांसमक्ष देण्यात आले व त्याचा नंबर नोट करून त्यास योग्य त्या सूचना देऊन पाठविण्यात आले. पोलिस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार व पंच असे वाहनाने लेंडवे चिंचाळे येथील ब्रिजच्या पुलाच्या खाली आडोशाला जाऊन थांबले व थोड्याच वेळात बनावट ग्राहकाचा संकेत असल्याने सर्व महिला व पुरुष अधिकारी अंमलदार यांनी छापा टाकला असता एक पीडित मुलगी, बनावट ग्राहक व लॉजचे मालक सापडले. त्यावेळी त्याची झडती घेतली असता पोलिसांनी बनावट ग्राहकास दिलेले पैसे आरोपी अविनाश विष्णू येडगे याच्याजवळ आढळले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित माने करीत आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने, सपोनि सत्यजित आवटे, पुरुषोत्तम धापटे, सलीम शेख आदींनी केली.