सोलापूर : पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या १० वर्षाच्या मुलाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लष्कर येथे मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. मृताच्या नातेवाईकास नुकसानभरपाई द्यावी, म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात आहे. या घटनेस महापालिकेला जबाबदार धरले जात आहे. नळाला पाणी कमी दाबानं येत असल्यानं मोटारलावून पाणी घेण्यात येतं. हा बालक मोटारलावलेल्या ठिकाणी आला असताना उघड्या वायरवर त्याचा पाय पडला आणि शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली असून अवेळी पाणी सोडणाऱ्या पालिकेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून लहानमुलाचं शव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. मयताचे काकाने या घटनेस पूर्णपणे महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले. महापालिकेच ढिसाळ नियोजन आणि वेळेवर, नऊ दिवस पाणी सोडले जाते. कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने पाण्याची मोटार लावावी लागली. संबंधित महापालिका अधिका-यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. शांतराज युवराज तल्लारे ( वय १०, रा. इमानियार चौक, कुंभार गल्ली, लष्कर) असे त्या मुलाचे नाव आहे.
नळाला पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे तल्लारे कुटुंबिंयानी पाणी ओढण्यासाठी मोटार लावलेली होती. पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी जाताच शांतराज याला विजेचा जोरात धक्का बसला. त्याला उपचारासाठी आई वडिलांनी व शेजाऱ्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना कळताच हॉस्पिटल परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी आक्रोश केला.