35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeसोलापूरआ. भारतनाना भालके अनंतात विलीन

आ. भारतनाना भालके अनंतात विलीन

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्यावर शनिवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रुनयनांनी भावनाविवश वातावरणात आमदार भालके यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आमदार भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

आमदार भारत भालके यांचे पुणे येथे उपचारादरम्यान शुक्रवारी निधन झाले होते. पुणे येथून त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेत शनिवारी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग, नामदेव पायरी याठिकाणी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी आमदार भालके यांच्या कार्यकर्त्यांकडून आमदार भारत भालके अमर रहे अशा घोषणाबाजी करण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे पार्थिव मंगळवेढा येथे अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले होते. दुपारी दोन वाजे नंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी सरकोली येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी आमदार भालके यांचे असंख्य समर्थक, नागरिक, कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास भालके यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. तत्पूर्वी शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अधिकारी मिंिलद शंभरकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार प्रणितीताई शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले आदी यावेळी उपस्थित होते.

1992 पासून तालुक्­याच्या राजकारणात सक्रिय
पैलवान असलेले आमदार भारत भालके हे थेट 1992 साली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आले. संचालकाच्या रूपाने त्यांनी थेट तालुक्­याच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी औदुंबरअण्णा पाटील यांचा विश्वास संपादन केला. त्याच विश्वासावर त्यांना कारखान्याचे उपाध्यक्षपदही मिळाले. दरम्यानच्या काळात वसंतराव काळे आणि औदुंबरअण्णा पाटील यांच्यात राजकीय दुही निर्माण झाली होती. यामध्ये आमदार भारत भालकेंनी काळे यांचे नेतृत्व मान्य करत कामाला सुरवात केली. काळे यांच्या निधनानंतर आमदार भारत भालके यांनी 2002 साली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वत:कडे घेतले. तेथूनच त्यांनी आमदार होण्याचे स्वप्न पाहिले.

जो विठ्ठल कारखान्याचा अध्यक्ष तो तालुक्­याचा आमदार अशी म्हणच त्या वेळी तालुक्­यात रूढ झाली होती. त्यानुसार आमदार भालकेंनी कामाला सुरवात केली. 2004 साली पहिल्यांदा त्यांनी विठ्ठल परिवाराच्या झेंड्याखाली विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरवात केली. कामाच्या जोरावर आणि दांडग्या लोकसंपर्कामुळे त्यांनी 2009 साली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचा धक्कादायकरीत्या परावभ केला होता. त्यावेळी त्यांना मुंबईला नेण्यासाठी कॉंग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी खास हेलिकॉप्टर पाठवले होते.

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला मतदारसंघाच्या विकासाठी तळमळीने झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, भारतनानांचं नेतृत्व हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेच्या सुख-दु:खांशी एकरुप झालेलं नेतृत्व होतं. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा लोकसंपर्क होता. पंढरपूर-मंगळवेढ्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासह भागाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केलं.

धाडसी लोकनेता हरपला
पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेप्रती आमदार भारतनाना भालके यांचे प्रेम होते. विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडून न्याय मिळवून देत. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारा धाडसी लोकनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्री. भरणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘आमदार भारतनाना भालके आणि आम्ही विधानसभेत एकत्र काम करीत होतो. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा जनसंपर्क होता. मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. लोकांच्या विकासासाठी ते तळमळीने काम करीत होते. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ते नेहमीच सर्वांच्या पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एक धाडसी लोकनेता हरपल्याचे आम्हाला दु:ख आहे.’
– दत्तात्रय भरणे (पालकमंत्री)

एक चांगला कार्यकर्ता हरपला
आ भारत भालके हे एक चांगला कार्यकर्ता होते. जनसामान्यांमध्ये त्यांच्या विषयी जिव्हाळा होता. जे झाले ते खूप वाईट झाले. त्यांच्या निधनाने एक चांगला कार्यकर्ता हरपला. त्यांचे निधन झाले यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दु:खद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.
-विजयसिंह मोहिते पाटील (माजी उपमुख्यमंत्री )

लढवय्या नेता
आ. भारतनाना भालके यांच्या निधनाने लढाऊ नेता आपल्यातून निघून गेला आहे. विधानसभेत शेतक-यांचे आणि दीन दुबळ्यांचे प्रश्न ते अतिशय आक्रमकपणे मांडत असत.एक सामान्य शेतकरी परिवारात जन्माला आलेला युवक ते सलग तीन वेळा आमदार हा प्रवास सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहला जाईल.त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
-आ. राम सातपुते (माळशिरस)

विकासासाठी झटणारा लोकनेता हरपला
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. सामान्यांशी एकरूप असलेला, विकासासाठी झटणारा लोकनेता हरपला आहे, अशा शब्दांत कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. श्री. वळसे-पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, ‘भालके यांचा मतदारसंघातील प्रत्येकाशी संपर्क होता. त्यांनी मतदारसंघातील शिक्षण, ग्रामविकास, सहकार, आरोग्य आणि पायाभूत विकासासाठी सातत्याने विधीमंडळात आवाज उठवला. मतदारसंघातील विकासाबाबत ते अतिशय आग्रही असत. पंढरपूर, मंगळवेढा परिसरातील दुष्काळी भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी सतत पाठपुरावा करीत असत. त्यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांची चांगली जाण होती. त्यांची संवाद साधण्याची हातोटी अतिशय चांगली होती. सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा नेहमी पुढाकार असे. भारतनाना भालके यांच्या अचानक निघून जाण्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी झाली आहे.’
– दिलीप वळसे-पाटील (कामगार मंत्री)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या