लापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यानंतर त्यांचे नातू आ. रोहित पवार यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्या राधाश्री निवासस्थावरच्या लंच डिप्लोमासीमुळे वेगळ्या चर्चे ला उधाण आला आहे. या बंद खोलीमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेली लंच डिप्लोमासीमध्ये कोणती राजकीय खलबत्ते झाली? नेमकी कोठे यांच्याकडून पवारांनी कोणाता राजकीय आढावा घेतला? याची खमंग चर्चा सध्या राष्ट्रवादी वर्तुळात चालू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि यांचे राजकीय वारसदार मानले जाणारे आ. रोहित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. सोमवारी (ता. ६ फेब्रुवारी) शहरामध्ये अचानक दौरा झाला. या दौऱ्यामध्ये पवारांनी युवकांशी संवाद साधला, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद असल्याने पार्क मैदानावर क्रिकेटचा आनंद घेतला. त्यानंतर नियोजित दौऱ्यामध्ये कुठलेही नियोजन नसताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना न देता मोजक्याच विश्वासू पदाधिकाऱ्यांना घेऊन रोहित पवारांनी थेट माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थान गाठले.
वास्तविक पाहता या भेटीला औपचारिक भेट असे गोंडस नाव दिले असले तरी या भेटीची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील पदाधिकाऱ्यांना देखील कुठलीच कल्पना नव्हती. या भेटीत आ. पवारांनी महेश कोठे यांच्याबरोबर बंद खोलीत सुमारे दीड तास चर्चा करत लंच घेतल्याने या लंच डिप्लोमसी मध्ये नेमकं काय घडले? याची खमंग चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये चालू आहे.
आ. रोहित पवार यांनी सध्या राज्यातील राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी विधानसभा तसेच पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा राजकारणामध्ये वाढलेला सक्रिय सहभाग सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावयास लावणाऱ्या आहेत. त्यामध्ये महेश कोठे यांच्या खांद्यावर आगामी पालिका निवडणुकीची जबाबादारी दिल्याने आ. रोहित पवार यांच्या भेटीचे गुढ वाढले आहे.
राधाश्रीवर आलेल्या रोहित पवाराबरोबर राष्ट्रवादीचे नेते सुधीर खारटमल, बिजू प्रधाने, माजी महापौर यू.एन. बेरिया यांच्यासह कोठे परिवारातील माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे आणि कोठे परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला पवारांनी शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कोठे परिवाराच्या वतीने रोहित पवार यांचा सत्कार करत स्वागत केले. त्यानंतर बंद खोलीत राजकीय खलबत्ते झाली. आगामी पालिका आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात पवारांनी महेश कोठे यांच्याकडून कानोसा घेतला. कोठे यांनी पवारांना नेमके काय सांगितले? याबाबत कमालीची गुप्तता राखली आहे.
यासंदर्भात महेश कोठे यांना विचारणा केली असता माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचा विवाह समारंभाला रोहित पवार यांना उपस्थित राहता आले नाही त्यामुळे ते प्रथमेश कोठे यांना भेटण्यासाठी आले होते. यापूर्वी सुध्दा त्यांचा दौरा नियोजित होता त्यावेळी सुध्दा त्यांनी विचारणा केली होती. मात्र प्रथमेश कोठे परगावी असल्याने त्यांची भेट झाली नाही. सोमवारी त्यांनी राधाश्री निवासस्थानी येऊन कोठे परिवाराची भेट घेतली. शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेऊन प्रथमेश कोठे यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगण्यात आले.