सोलापूर : शहरातील अवैध धंदे तथा व्यवसाय बंद व्हावेत, गुन्हेगारांवर वचक राहावा, जेणेकरून सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील, या हेतूने तत्कालीन पोलिस आयुक्तांनी विशेष पथक नेमून अनोखा प्रयोग केला. पण गुन्हे शाखा, पोलिस ठाणी, डीबी पथके असताना त्या पथकाची गरज नसल्याने ते बरखास्त करण्यात आले आहे.
तत्कालीन पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही दिवसांतच विशेष पथक नियुक्त केले. त्यात सात पोलिस कर्मचारी नेमून सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांना प्रमुख केले. या पथकाने विशेष कामगिरी करीत काही गुन्ह्यांच्या तपासात मोठी भूमिका बजावली. आठ महिन्यांत ४९ गुन्हे नोंद केले. त्यात शहरातील जुगार, मटका, डान्स बार, हाडांचा कारखाना अशा कारवायांचा समावेश आहे. पण, शहरातील सात पोलिस ठाण्यांमध्ये पुरेसे कर्मचारी नसतानाही हे पथक नियुक्त केले होते.
विशेष बाब म्हणजे सात पोलिस ठाणी, त्याअंतर्गत प्रत्येकी एक डीबी (गुन्हे प्रकटीकरण) पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच), पोलिसांची गस्त एवढी सगळी यंत्रणा असतानाही बैजल यांनी त्यांच्या अधिकारात हे विशेष पथक नियुक्त केले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यांच्या कारवायादेखील वाढल्याचे पाहायला मिळाले. पण, आता ते विशेष पथक बरखास्त करून त्या कर्मचा-यांची नेमणूक गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.
शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय (धंदे) बंद व्हावेत, गुन्हेगारी वाढणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. शहरातील वाहतूक कोंडी, अपघात कमी होण्यासाठी प्रत्येक वाहतूक पोलिसाने नेमलेल्या पॉइंटवर दिसायलाच पाहिजे. रात्रीच्या वेळी ड्यूटी करणा-या वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हातात रिफ्लेक्टर काठी व सिल्व्हर कलरचे पट्टे असलेले भगवे जॅकेट घातलेच पाहिजे. प्रत्येकजण पोलिस ड्रेसमध्ये असावा. शहरातील सर्वच भागात पेट्रोलिंग करावे, अशी स्ट्रिक्ट पोलिसिंग मला हवी आहे, अशा सक्त सूचना पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांना दिल्या आहेत.