माढा : माढा विधानसभा मतदारसंघातील सीना नदीच्या काठावरील अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या पिकांचे,वाहून गेलेल्या शेतीचे,फळबागांचे,मयत जनावरांचे आणि पडझड झालेल्या घरांचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आमदार बबनदादा शिंदे यांनी सर्व अधिका-यांना दिल्या.
बुधवारी आमदार शिंदे यांनी रिधोरे , तांदूळवाडी , वडशिंगे,निमगांव (मा), सुलतानपूर,महातपूर,दारफळ, उंदरगाव, केवड, कापसेवाडी, हटकरवाडी, धानोरे, बुद्रुकवाडी,खैराव व मानेगाव येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे व इतर बाबींची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधत त्यांना पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून नक्कीच मदत मिळणार असल्याचे सांगितले.येत्या दोन ते तीन दिवसांत नुकसान झालेले रस्ते व पुल,पडलेले वीजेचे खांब व डिपीची दुरुस्ती आणि वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.ज्या घरात पुराचे पाणी शिरले आहे व स्थलांतरित कुटुंबांना शासनाकडून मदत व धान्य देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.एकाच वेळी 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेला भाग शासनाच्या नियमानुसार भरपाईस पात्र ठरतो. आपल्या भागात तर सरासरी 120 मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडल्याने शासनाची मदत निश्चितच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीना नदीवरील पुलांचे कठडे व बेरिकेट तुटून मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या पाहणीनंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी कृषी, महावितरणचे,महसूल आणि बांधकाम विभागाच्या अधिका-यांना शेतक-यांसमोर बोलावून समस्या व व्यथा जाणून घेत दोन ते तीन दिवसांत सोडविण्याच्या सूचना केल्या.सर्व पंचनामे केलेल्या बाबीं व याद्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर लावण्यास सांगितले जेणेकरून एकही नुकसानग्रस्त व्यक्ती व शेतकरी शासनाच्या अनुदान व मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी असे आदेश त्यांनी दिले.तसेच नोंदणी असलेल्या खोडवा,निडवा आणि सुरू ऊसाचे गाळप चालू गळीत हंगामात वाहनांसाठी वाटा तयार होताच प्राधान्याने गाळप करू असे आश्वासनही दिले.
याप्रसंगी गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील,बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता शफीक नाईकवाडी,महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रिया राठोड,कनिष्ठ अभियंता शुभम धारोरकर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार, खासदार शेतक-यांच्या बांधावर, प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा नवा फंडा