सोलापूर : खाजगी सावकाराने कर्जाच्या रक्कमेसाठी दमदाटी शिवीगाळ करित जिवे मारण्याची धमकी दिली. कोरोनामुळे मिठाई विक्रीची उलाढाल ठप्प झाली. या विवंचनेतून केतन विजयकुमार उपासे, रा. सत्तरफुट रोड, गोली अपार्टमेंट यांनी शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याची सिव्हील पोलिस चौकीत नोंद झाली. त्यानंतर उपासे यांचे वडिल विजयकुमार भिमाशंकर उपासे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवसाय वाढीसाठी उपासे यांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. काही महिने व्याजासह मुद्दलही फेडली होती मात्र लॉकडाउनमुळे ते अडचणीत आले. व्याजाची रक्कम भरणेही अवघड झाले. खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून केतन उपासे यांनी अशोक चौकातील रेणुका स्विटस् हॉटेल विक्रीस काढले. त्याचा व्यवहार अनिल व्होटकर व सुभाष जाधव या सावकारांबरोबर ठरला. त्या दोघांनी उपासे यांना दहा हजार इसारा दिला. उर्वरित रक्कम तीन महिन्यानंतर देण्याचे ठरलेले असतानाही त्यांनी ती रक्कम दिली नाही. व्यवहार रद्द झाल्यानंतर सावकाराने उपासे यांच्याकडे ६ लाख ५० हजाराचे व्याज मागितले. त्यापैकी त्यांनी सव्वा तीन लाख व्याज दिलेही. मात्र उर्वरित रक्कमेसाठी त्यांना सावकाराने त्रास देण्यास सुरूवात केली. खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून उपासे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले.
याप्रकरणी किरण आरगे, जयंत शेळके, अनिल लक्ष्मण जाधव, सोहम गायकवाड, शिवशरण अग्रवाल, पुजा अग्रवाल, सुभाष राजमाने (रा. टेंभुर्णी), सोमा सावकार, बिरण्णा बहिरवाडे, काका जाधव, सुरेश आण्णप्पा कोकटनुर, अनिल अमदाळे, अनिल होटकर, सुभाष जाधव यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हेगार वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली असुन उपासेंनी आत्महत्येपूर्वी मोबाईलचा फ्लॅश मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दहा हजाराहून अधिक रक्कम घेतल्यास त्यावर दहा ते वीस टक्के व्याजदर लावण्यात येतो. आठवडयाला अथवा दर महिना व्याज न दिल्यास संबंधीत व्याज मुद्दलात जमा करून त्यावर व्याज लावण्याात येत. या चक्रवाढ व्याज दरामुळे मुद्दल अल्पावधीत दुप्पट, तिप्पट, चौपट होते.
व्यवसायात मंदीमुळे कर्जाउ रक्कम भरणे कठीण जाते. त्यावेळी खाजगी सावकारकाडून धमक्या दिल्या जातात. तत्पुर्वी कर्जदाराकडून कोरे स्टॅम्प, धनादेश घेतले जातात. त्या भितीपोटी कर्जदार आत्महत्येचे पाऊल उचलतात असे दिसून आले आहे. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कर्जदारांनी थेट पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.