सोलापूर : शहर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊनची आवश्यकता नाही. मात्र नागरिकांनी गाफील राहू नये, मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टेंस मेंटेन करणे आवश्यक आहे. मंगल कार्यालय जास्त गर्दी करू नये, दुकानात , शाळा-महाविद्यालयात मस्कचा वापर व्हावा यासाठी अधिकारी तपासणी करणार असुन जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढू नये म्हणून नियम अधिक कडक करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी दिली.
राज्यातील अकोला, अमरावती, यवतमाळ मध्ये लॉकडाऊन लावण्याचा राज्य शासन विचार करीत आहे. दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना हळूहळू वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन काय तयारी करीत आहे, या विषयी जिल्हाधिकारी शंभरकर यांना विचारले असता ते म्हणाले, सोलापूर शहरात कोरोनाचे प्रमाण कमी तर ग्रामीणमध्ये वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे. सोलापूर जिल्ह्यात तूर्तता लॉकडाऊनची गरज नाही. कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकानी त्याचे महत्त्व समजून घेऊन खबरदारी घेणे गरजेचे आहे आणि प्रशासनास सहकार्य करावे असेही शंभरकर यांनी सांगितले.
मास्क, हॅन्डग्लोज, गर्दी करू नये म्हणून आदेश काढण्यात आले होते. कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख नागरिकांकडून तीन कोटी 30 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आताही मास्क न वापरण्यावर 500 रुपयाची दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहे.
हॉटेल , मंगल कार्यालयांवर करडी नजर राहणार असून मास्क आणि सोशल डीस्टन्स नसल्यास मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुस-या वेळी गुन्हा दाखल करू तर तिस-या वेळी दुकान, हॉटेल, मंगल कार्यालये सील करणार. याबाबत बैठक घेऊन आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात येणार असून होम आयसोलेशन बंद करून बधितांवर कोव्हिडं केअर सेंटर मध्ये उपचार केले जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिका-यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
मास्क न वापरण्यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिका-यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी मुख्यमंर्त्यांनी मास्क न घालणा-यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सांगितले. नागरिकांनो कोरोनाचे नियम पाळा अन्यथा दंडात्मक कारवाई करू असा इशारा शंभरकर यांनी दिला.
शाळा, कॉलेजवर होणार तपासणी
सोलापूर शहर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात जाउन अधिकारी तपासणी करणार आहेत. ज्या शाळा महाविद्यालयात विद्यार्थी विद्यार्थिनी मास्क न वापरत नसतील कोरोनाचे नियम तोडल्यास कारवाई करणार.