अक्कलकोट : अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुड्डे यांच्या दालनात दारू पिऊन गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली मल्लिनाथ सातप्पा जिडगे (४५, रा. म्हाडा कॉलनी, अक्कलकोट) या ग्रामसेवकावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
३० जून रोजी दुपारी २.३० वाजता हा प्रकार घडला. याबाबत विस्तार अधिकारी शंकर गणपती घुगरे यांनी तक्रार नोंदवली आहे. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, ग्रामसेवक मल्लिनाथ जिडगे हा गुरुवारी दुपारी मद्यप्राशन करून थेट बीडीओ चेंबरमध्ये आला. तो बीडीओबरोबर हुज्जत घालत होता. दरम्यान, विस्तार अधिकारी भीमा तुळजापुरे, प्रकाश कोळी, दयानंद परिचारक यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. दरम्यान, बीडीओ खुडे यांनी तत्काळ उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यास ताब्यात दिले. पोलिसांनी जिडगे याच्यावर गुन्हा दाखल केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी ग्रामसेवक जिडगे याची ग्रामीण रुग्णालयात तत्काळ वैद्यकीय तपासणी केली. त्याच्या अहवालावरून जिडगेचे पुढील भवितव्य ठरणार आहे. जिडगे आजपर्यंतच्या सेवेत वादग्रस्त ठरला असून, ज्या गावात त्याने सेवा बजावली आहे तेथे त्याने गोंधळ घातल्याची चर्चा दिवसभर पंचायत समितींच्या वर्तुळात होती.