सोलापूर : देवस्थानमध्ये गेली अनेक वर्ष राजकारण घुसले आहे. राजकीय जोडे बाहेर ठेवून देवस्थानाचा कारभार चालू आहे. मात्र काही विनाकारण देवस्थानला बदनाम करण्यासाठी कुटील राजकारण करत आहेत. एक प्यादे पुढे करत नाहक आरोप करत बदनामीचे षडयंत्र चालू आहे. राजकारणासाठी इतर क्षेत्र असताना देवस्थानातील राजकारणाचा खेळ थांबवायला हवे अन्यथा श्री सिध्देश्वर महाराज अद्याप जिवंत आहेत. जर असेच वागाल तर भाजून जाल, त्याचे चटके बसल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी विरोधकांना दिला.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानमध्ये पंच कमिटीच्या कार्यालयात बुधवारी काडादी यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. पाटील यांचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. पाटील हे एक प्यादे आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. असे सांगत अप्रत्यक्ष पणे आमदार विजकुमार देशमुख यांचे नाव न घेता टिका केली.
पाटील आणि काडादी सोलापुरात कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. जगदीश पाटील यांच्याशी माझे गेल्या अनेक वर्षापासून अतिशय जवळचे संबंध होते. परंतु ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या यात्रा काळात शोभेच्या दारुकामावेळी नंदिध्वजांना होम मैदानावर यायला उशिरा झाला. त्यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीशांसह इतर अनेक न्यायाधीश व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यांना किती वेळ ताटकळत थांबवायचे म्हणून आपण दारूकाम सुरू करण्यास सांगितले.
त्यादरम्यान, वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांच्याकडे असलेला माईक कोणालाही न देण्याची सूचना केली होती. मात्र, पाटील यांनी देवस्थानचा हा माइक त्यांच्याकडून स्वत:कडे घेतला. त्यामुळे त्यांच्या या चुकीबाबत आपण त्यांना बोललो असता ते दुखावले गेले. वास्तविक याबाबत त्यांनी आपल्याला नंतर तरी विचारायला हवे होते. परंतु तसे न करता त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून अर्धवट माहितीच्या आधारे माध्यमांना दिशाभूल करणारी व चुकीची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे माध्यमातून समजते. याबाबत न्यायालयात आपण योग्य ते उत्तर देऊ असे काडादी म्हणाले.
या पत्रकार परिषदेस नीलकंठप्पा कोनापुरे, सिध्देश्वर बमणी, गुरूराज माळगे, ॲड. आर. एस. पाटील, विश्वनाथ लब्बा, गिरीश गोरनळळी, चिदानंद वनारोटे, शिवकुमार पाटील, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, प्रा. डॉ. राजशेखर येळीकर, सुरेश म्हेत्रे आदी उपस्थित होते. आपले पणजोबा, आजोबा, वडील आणि काकांनी देवस्थानमध्ये मोठे काम केले आहे. सोलापूरच्या विकासासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या आणि त्या नावारूपाला आणल्या. सर्वसामान्यांना उपयोग व्हावा या हेतूनेच या संस्थांची स्थापना केली. जे जे चांगले करता येईल ते ते त्यांनी केले. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या संस्थांमध्ये काम सुरू होते. राजकारण घुसले आणि चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणारे आरोप करून प्रतिमा खराब करण्याचे काम सुरू असल्याचे काडादी यांनी सांगितले.
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानमध्ये काडादी परिवारासह समाजातील अनेक प्रतिष्ठित घराण्यांकडून पूर्वापार सेवा सुरू आहे. परंतु काडादी परिवाराने अधिक सेवा केली आहे. असे असताना देवस्थान कुणाच्या बापाचे नाही, असा मुद्दा उपस्थित करणाऱ्या माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विधानावरून धर्मराज काडादी हे भावुक गहिवरल्याचे दिसून आले. तसेच आपल्यालाही इतरांचा बाप काढता येतो, परंतु आपण तसे करणार नाही, असेही काडादी म्हणाले. यापुढील काळात श्री सिध्देश्वर देवस्थान आणि सिध्देश्वर परिवारविरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात नगरसेवक, आमदार, खासदार आणि अन्य निवडणुकांत सिध्देश्वर परिवाराकडून उमेदवार दिला जाईल, अशी घोषणा श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. हिरेहब्बू हे श्री सिध्देश्वर यात्रा काळातील केवळ मानकरी व पुजारी आहेत. त्यांनी त्यांच्या मर्यादेतच राहावे, असा इशारा देऊन हिरेहब्बू यांच्याकडे यापूर्वी देणगीरूपाने जमा असलेल्या वस्तू या श्री सिध्देश्वर देवस्थानच्याच आहेत. त्या मागवून घेऊ, असेही धर्मराज काडादी यांनी स्पष्ट केले.