24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरशेतात केली गांजाची लागवड, शेतकर्‍याला पोलिस कोठडी

शेतात केली गांजाची लागवड, शेतकर्‍याला पोलिस कोठडी

एकमत ऑनलाईन

मोहोळ : दीड एकर उसातून सरासरी एक लाख ते दीड लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते. त्यासाठी उसाला वर्षभर सांभाळवं लागतं. पाणी सोडा, खतं टाका, तोडणी व कारखान्याला जाईपर्यंत कटकट आहेच. एवढी कटकट नकोच एका झटक्यात चार पाच लाख कमविण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आणि दीड एकर उसाच्या फडात जागोजागी गांजाचा बिया टाकल्या.

पाच महिन्यात गांज्याची वाढही चांगली झाली होती. याची कुणकुण पोलिसांना लागली आणि भांडाफोड झाला. झटपट पैसे कमविण्याच्या नादात तो शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही घटना आहे मोहोळ तालुक्यातील वटवटे गावातील.

वटवटे (ता. मोहोळ) येथील ढोबळे वस्ती येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाच्या पिकामध्ये चक्क गांजाची लागवड केली होती. ही माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कामती पोलिसांनी तेथे छापा टाकून उघडकीस आणली. या कारवाईत अंदाजे ४ लाख ४१ हजार तीनशे रुपये किंमत असलेला ४४.१३ किलो वजनाचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदाशिव दत्तू ढोबळे ( रा. वटवटे, वय ६२) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान कामती पोलिसांनी सदर आरोपीस मोहोळ न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत म्हणजे तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

सपोनि अनिल सनगल्ले व त्यांच्या पथकाला याबाबत गोपनीय माहिती मिळाली. वटवटे येथील शेतकरी सदाशिव ढोबळे यांनी आपल्या शेतातीलउसाच्या पिकामध्ये गांजासदृश वनस्पतीची लागवड केली असल्याची माहिती मिळाली.

ती झाडे गांज्याची असल्याचे खात्री झाल्याने सदरची झाडे मुळासह काढून त्याचेसोबत आणलेल्या वजनकाट्यामध्ये वजन केले असता ४४.१३ किलो वजनाचे ४ लाख ४१ हजार तीनशे रुपये किमतीची गांजा वनस्पती मिळून आली. अमली पदार्थ कामती पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. याबाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास कामती पोलीस ठाणेचे सपोनि अंकुश माने हे करीत आहेत. आरोपीस गांजा पिण्याचे व्यसन होते. दरम्यान कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्याला गांजा मिळत नसल्याने त्याने स्वतःच्या शेतातच गांजाची लागवड केल्याचे सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या