24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeसोलापूरपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान

पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. ज्यांना शक्­य आहे त्यांनी पाणी देऊन पिके जगवली. मात्र, आता हातातोंडाशी आलेला घास मागील दोन दिवसांत झालेल्या मोठ्या पावसाने हिरावून नेला आहे. बार्शी , माढा करमाळा मोहोळ तालुक्­यात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. सीना नदीकाठच्या शेतक-यांची तर संपूर्ण पिकेच वाहून गेली आहेत.

जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या दुष्परिणामामुळे पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. जून, जुलैमध्ये पावसाने ओढ देणे आणि उर्वरित पावसाळ्यात कमी वेळात जास्त पाऊस पडणे हे आता नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे मागील जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने या काळात अनेक शेतक-यांची सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सुकून गेली. अनेक शेतक-यांनी सोयाबीन पिकावर रोटर फिरवला तर ज्या शेतक-यांनी शक्­य आहे, त्यांनी पाणी देऊन पिके जगवली. मात्र, आता काढणीला आलेली पिके मागील दोन दिवसांत झालेल्या मोठ्या पावसाने वाया गेली आहेत.
सध्या भाजीपाला उत्पादक दुहेरी संकटात आहेत.

बाजारात कोणत्याही भाजीपाल्याला दर नाही. ढोबळी मिरची, टोमॅटो यांसारखी खर्चिक पिके रस्त्यावर टाकून द्यावी लागत आहेत. इतर भाजीपाल्यांनाही अपेक्षित दर मिळत नव्हता. गौरी-गणपतीच्या सणात अनेक प्रकारच्या भाज्या आवश्­यक असतात, त्यामुळे या कालावधीत तोडणीस येतील अशा भाज्यांच्या लागवडी शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, यंदा अगोदर पिकलेल्या भाजीपाल्याला दर मिळालेला नाही. सणासुदीच्या काळात तोडणीस येणारी पिकेही अतिपावसामुळे वाया गेली आहेत. यामुळे भाजीपाला उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.

मोहोळ, माढा, बार्शी, करमाळा या परिसरात कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. सध्या कांदा लागवडी सुरू आहेत. कांदा लहान असताना मोठा पाऊस पडला आणि शेतात नदी, नाल्याचे पाणी शिरले तर पिके वाया जातात. यंदा सीना, भोगावती व बार्शी तालुक्­यातील घोरड्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या परिसरातील अनेक लहान- मोठे ओढे, नाले कमी वेळेत अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडल्याने भरून वाहत आहेत. अनेक शेतक-यांनी नुकत्याच केलेली कांदा लागवडी वाया गेल्या आहेत. यामुळे कांदा बियाणे, मशागत, लागवड याचा खर्च वाया गेला असून कांदा उत्पादक शेतक-यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून पडणा-या जोरदार पावसामुळे मोहोळ करमाळा माढा या तालुक्­यातील शेतशिवारात काढणीला आलेल्या खरिपातील उडीद, सोयाबीन, मूग या पिकांचे नुकसान होत असून, हा पाऊस असाच चालू राहिला तर पक्व झालेल्या शेंगा जागेवरच उगवतील की काय, अशी भीती शेतक-यांना वाटू लागली आहे. त्यामुळे सध्या पडणारा पाऊस म्हणजे पेरणीला आला होता नंतर आता काढणीलाच बरसला, पदरात पडणा-या सोयाबीन, उडदाच्या चार शेंगा पाण्यात आणि मातीत घालून परतला असा नुकसानकारक ठरू लागला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या