करमाळा : शेतातील विद्युत डीपीवर चढून काम करताना शॉक बसून कंत्राटी कामगार जागीच मयत झाला. ही घटना कंदर (ता. करमाळा) येथे सोमवारी (ता. 6) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी संबंधित विद्युत अभियंता आणि दोघा ऑपरेटर विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गोविंद बाबुराव खोडवे (२८ रा. येलडा ता. अंबाजोगाई जि. बीड) असे मयत झालेल्या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. तो सोमवारी सकाळच्या सुमारास कंदर येथील उजनी जलाशयाजवळ असलेल्या आरिफ इनामदार यांच्या शेताजवळील डीपीवर चढून काम करीत होता. त्यावेळी अचानक विद्युत पुरवठा चालू झाल्याने गोविंद हा जागीच मयत झाला होता.
या प्रकरणी मयताचे चुलत बंधू पंडित खोडवे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी संबंधित विद्युत अभियंता तसेच किशोर नागनाथ तळेकर आणि ज्ञानदेव तुकाराम लोकरे (विद्युत ऑपरेटर , रा. कंदर) या तिघाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार माहुरकर करीत आहेत.