बार्शी : लातूर आगारातील बस पुण्यास जाण्यासाठी बार्शीकडे घेऊन येत असताना रोडवर गर्दीमुळे थांबवल्याने एकाने येऊन मागेच का थांबवली नाही असे म्हणून चालकास झोंबाझोंबी केली. त्यानंतर ती बस बार्शी आगारात थांबविताच प्रवाशाने बसची चावी घेऊन पसार झाला. याप्रकरणी प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बार्शी लातूर रोडवरील बाजार समितीच्या जवळ दिनांक ११ रोजी सांयकाळी सात वाजता घडली. याबाबत लातूर आगाराचा चालक महेश मधुकर गाडेकर (वय ३१, रा. दर्जी बोरगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आण्णा गोकुळ विधाते (रा. उंबरगे, ता. बार्शी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ११ रोजी लातूर येथून शिवशाही बस घेऊन चालक बार्शीमार्गे पुण्याला जाण्यासाठी येडशीमार्गे जात होते.
गाडी बाजार समितीजवळ येताच वाहतुकीची वर्दळ असल्याने चालकाने गाड़ी थोड़ी पुढे नेल्यानंतर विधाते हा चालकासोबत बाचाबाची करून तू मागेच उभा का केली नाही म्हणून झोंबाझोंबी करून मारण्यासाठी येताच तेथील लोकांनी सोडवासोडवी केली. त्यानंतर चालकाने ही बस बार्शी आगारात लावून तेथील कंट्रोलना याची माहिती देत असताना विधाते याने बसजवळ येऊन बसची चावी काढून नेली. पुढील तपास सपोनि सिरसट हे करत आहेत.