सोलापूर : सोलापूर मध्य रेल्वे अंतर्गत मुंबई – सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस येत्या जानेवारी महिन्यात सुरू करावी, कोव्हीड काळानंतर अद्याप सुरू नसलेल्या रेल्वे तात्काळ सुरू कराव्यात, बसवा व हसन एक्स्प्रेसला अक्कलकोट तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला मोहोळ येथे थांबा मिळावा, यांसह सोलापूर मध्य रेल्वेच्या अनेक विषयांवर खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री यांना वरील सर्व मागण्यांचे निवेदन दिल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. यामधे मुंबई सोलापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन येणाऱ्या जानेवारी महिन्यात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेदरम्यान १२ ते १५ जानेवारी दरम्यान करण्याची मागणी खा.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी केली.
तसेच सोलापूर – द्वारका नवी एक्सप्रेस सुरू व्हावी. अक्कलकोट रोड स्टेशनवर सुरु असलेले पुलाचे काम वेगाने पूर्ण व्हावे. सोलापुरातून बंद असलेले सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या तत्काळ सुर कराव्यात. सोलापूर- त्रिवेंद्रम दरम्यान किसान रेल सुरू व्हावी यासह प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी, खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केली.
सोलापूर जिल्ह्याचे आध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील महत्व लक्षात घेता सोलापूरहून रेल्वेचे जाळे अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेसेवा अत्यावश्यक आहे. विशेष करून देशात सेमी व हायस्पीड रेल्वेचे जाळे वेगाने कार्यरत होत आहेत. सोलापुरातील अध्यात्मिक पर्यटन, कृषी पर्यटन तसेच औद्योगिक उलाढाल होण्यास मदत मिळेल. मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन लवकर सुरु व्हावे.
सोलापूर हे तीर्थस्थळांसाठी प्रसिद्ध असून दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना याचा लाभ होईल. तसेच सोलापूर- द्वारका नवी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी बसवा एक्सप्रेस (१७३०८) व हसन एक्सप्रेस (११३११) ला अक्कलकोट रोड स्टेशनवर थांबा मिळावा. सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता टिकेकरवडी रेल्वे स्थानक टर्मिनल मध्ये रुपांतरीत व्हावे. यामुळे प्रवाशांची भविष्यात चांगली सुविधा होईल. हुबळी – निजामुद्दीन – हुबळी ही साप्ताहिक रेल्वे सोलापूरमार्गे दिल्लीस जाण्यासाठी प्रति शनिवारी सोलापूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहे. यामुळे कर्नाटक एक्स्प्रेस शिवाय ही दुसरी रेल्वे गाडी दिलीस जाण्यासाठी सुविधा होत असून ही गाडी दररोज सुरू करण्याची मागणी केली.
सोलापूर – फलूकनुमा पॅसेंजर (०१३९७) , सोलापूर- विजापूर पॅसेंजर (०१३९५), कोरोना नंतरच्या सध्याच्या परिस्थितीत पूर्ववत करणे. तसेच सोलापूर – धारवाड (०७३२१) हि गाडी रात्री १२ नंतर ऐवजी पूर्वी करणे, तसे केल्यास हैद्राबाद – हुबळी (१७३१९/२०) या गाडीस होटगी थांबा सोलापूर पर्यंत करण्यास सोया होईल, सोलापूर – फलूकनुमा पॅसेंजर (०१३९७) सकाळी १०.२५ ऐवजी ९.३० करणे, या दोन्ही गाड्यांच्या वेळात बदल करणेबाबत मागणी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रेल्वेबाबतच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करीत असल्याचे, खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. कोरोना काळानंतर बंद झालेल्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची आग्रही मागणी केली. खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या या सर्व मागण्यांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सोलापूरकरांच्या मागण्यांना लवकरच न्याय मिळेल.