मोहोळ : मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता ३ एप्रिल) १८ जागांसाठी अठराच अर्ज दाखल झाले आहेत, त्यामुळे मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली असून घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
मोहोळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना १९५४ मध्ये झाली आहे. स्थापनेपासून म्हणजे गेल्या ७५ वर्षांपासून बाजार समितीवर माजी आमदार राजन पाटील परिवाराचे वर्चस्व आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या अगोदर त्यांचे वडील (स्व.) बाबूराव (अण्णा) पाटील यांचे वर्चस्व होते. नवीन धोरणानुसार या निवडणुकीसाठी शेतकरी उमेदवारी अर्ज भरू शकत होता. मात्र, एकही शेतकरी अर्ज आलेला नाही. दरम्यान विरोधकांनीही या निवडणुकीत इंटरेस्ट न दाखविल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी बाजार समितीने अनेक प्रयत्न केले आहेत. तसेच, व्यापारी व शेतकऱ्यांना सोयी सुविधा दिल्या आहेत. त्यात व्यापारी नवीन गाळे, अंतर्गत रस्ते, शेतकरी निवास आदींचा समावेश आहे. या निवडणुकीचे सर्वाधिकार माजी आमदार राजन पाटील यांना देण्यात आले होते. तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा या निवडणुका डोळ्या समोर ठेवून माजी आमदार पाटील यांनी बऱ्यापैकी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
बाजार समितीसाठी निवडलेले सर्व अठराही चेहरे नवीन आहेत. त्यात दोन महिलांना संधी देण्यात आली आहे. बिनविरोध निवडीबद्दल माजी आमदार पाटील, लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी विरोधकांसह ज्यांनी ज्यांनी बिनविरोधसाठी सहकार्य केले त्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान भविष्यात व्यापारी व शेतकऱ्यांना सरकारच्या नवीन धोरणानुसार जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील, त्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे माजी आमदार पाटील यांनी बाजार समिती बिनविरोध झाल्यानंतर स्पष्ट केले.
मतदार संघनिहाय आलेली उमेदवारी अर्ज
सोसायटी मतदारसंघ : प्रशांत भागवत बचुटे (वरकुटे), नागराज आप्पासाहेब पाटील (शेजबाभूळगाव), गोविंद अंबरशी पाटील (डिकसळ), संतोष पांडुरंग सावंत (पिरटाकळी), माणिक नेमिनाथ सुरवसे (वडदेगाव), धनाजी सुरेश गावडे( सावळेश्वर), सचिन जनार्दन बाबर (खंडाळी),
सोसायटी महिला राखीव : स्मिता दत्तात्रय काकडे (पोखरापूर) दीपाली सज्जन चवरे (पेनूर)
सोसायटी ओबीसी मतदारसंघ : विकास बाबासाहेब कुंभार(मोरवंची)
भटके विमुक्त जाती-जमाती : शाहीर गणपत सलगर (सारोळे)
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदार संघ : पोपट केशव जाधव (येणकी), बाळकृष्ण आप्पासाहेब साठे (भोयरे), नवनाथ माणिक वराडे (इंचगाव)
ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती : बाळासाहेब पांडुरंग गायकवाड (जामगाव बुद्रूक)
व्यापारी मतदारसंघ : महेश शरद आंडगे(मोहोळ), राजशेखर सुरेश घोंगडे (मोहोळ)
हमाल तोलार मतदार संघ : भीमराव विठोबा राऊत(अनगर)