सोलापूरः कॅन्सरने त्रस्त पोलीस हवालदाराने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली, पण निवृत्ती घेऊन दोन महिन्यांनंतरही पेन्शन सुरू न झाल्याने हतबल झालेले नाशिक मध्यवर्ती कारागृह विभागातील कल्याण दगडू गावसाने (५३, रा. माशाळवस्ती, विजापूर रोड, सोलापूर) या हवालदाराला चक्क दोन हजारांची लाच द्यावी लागली. पण तरीही पेन्शन न सुरु झाल्याने त्यांनी या घटनेची प्रशासनाकडे तक्रार केली.
त्यानंतर वरिष्ठांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. यातूनच आत्महत्या केली, असा आरोप करत आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी कल्याण यांचे पुत्र गणेश गावसाने यांनी केली आहे. मयत गावसाने हे कारागृह विभागात पोलीस हवालदार म्हणून कर्तव्यास होते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी ५ जानेवारी रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला तो अर्ज ४ एप्रिल रोजी मंजूर झाला. त्यानंतर गावसाने यांना नाशिक कारागृह येथे कार्यालयीन कागदपत्रांच्या प्रक्रिया पूर्ण करत पेन्शन, फंड, ग्रज्युईटी तसेच रजेचे पैसे मिळावेत याकरिता अर्ज केला. पण तरीही पेन्शन लागू झाली नाही. यामुळे त्यांनी औरंगाबाद येथील मध्य विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती कळविली.
यानंतर मात्र नाशिक कारागृहातील संबंधित अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी गावसाने यांच्यावर चिडून होते, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तसेच जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली, पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कल्याण गावसाने यांनी राहत्या घरात बेडरूममधील लोखंडी हुकास बेडशिटच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. कुटुंबीयांना ही घटना लक्षात येताच त्यांना लगेच बेशुद्धावस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मत घोषीत केले.
सर्व्हिस पुस्तक पडताळणीसाठी दोन हजार पाठवून द्या, अशी मागणी कारागृहातील एका महिला पोलिसाने केली. काम लवकर व्हावे यासाठी गावसाने यांच्या मुलाने २५ मे रोज यूपीआयवरून दोन हजार रुपये पाठवले. यानंतर मात्र गावसाने यांना संबंधितांकडून आम्हाला फोन करु नका, असे सांगण्यात आले. आणि ८ जून रोजी त्या संबंधित महिला पोलिसाने दोन हजार रुपये परत पाठवले, अशी माहिती गणेश गावसाने यांनी दिली.