24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeसोलापूरपस्तीस दिवसांनंतरही सरकार दोघांवर चाललय: आ. प्रणिती शिंदे

पस्तीस दिवसांनंतरही सरकार दोघांवर चाललय: आ. प्रणिती शिंदे

एकमत ऑनलाईन

सोलापूर : राज्याला स्थिर सरकार मिळाले, तर महागाई कमी होईल. अशी आशा वाटते. कारण, केंद्राकडून महागाई कमी होताना दिसत नाही. आज सिलिंडरचा दर ११०० रुपये झाला आहे. दोन वेळचे जेवण बनवणेही कठीण झाले आहे. तरीही कोरोनानंतर आलेल्या निर्बंधमुक्त नागपंचमीच्या सणामुळे आज सर्व आनंदित आहेत. आज सरकार बदलून ३५ दिवस झाले. तरीही फक्त दोघांवरच सरकार चाललंय. काय ते झाडी, काय ते डोंगार, असे त्यांचे जरी ओके असलं तरी महाराष्ट्रातील जनतेचे नॉट ओके आहे, असा टोलाही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार शहाजी पाटील यांना नाव न घेता लगावला.

आमदार शिंदे या नागपंचमीच्या निमित्ताने सोलापुरात आल्या होत्या. त्या वेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. प्रणिती शिंदे यांनी या वेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत यांच्या ईडीच्या चौकशीवरून भाजपला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, खूप खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. जे प्रकरण २०१५ मध्ये बंद झालंय, ते आज पुन्हा काढून सोनिया गांधींना त्रास दिला जातोय. केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरू आहे. सोनिया गांधी या देशाच्या एवढ्या वरिष्ठ नेत्या, एका मोठ्या पक्षाच्या प्रमुख असून त्यांना दहा-दहा वेळा ईडीकडून चौकशीला बोलवले जाते. राहुल गांधी यांना बोलावून घेताय. सहा-सहा तास चौकशीला बसवताय आणि एकच तास चौकशी करताय, तीही व्यर्थ. ही कसली पद्धत, असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

आमदार शिंदे म्हणाल्या की, पार्लमेंटमध्ये भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या हमरी तुमरीची भाषा करतायत. भाजपची खालच्या पातळीला जाऊन ॲटॅक करण्याची जी संस्कृती आहे, ती दिसून येत आहे. मात्र, स्मृती इराणींचे सिलिसोलचे प्रकरण काय आहे, ते तुम्हाला माहिती आहे. इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट डिलीट करतात, त्यामुळे मला असे वाटते की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेकू नये. मात्र, भाजपची तशी संस्कृतीच नाही, त्यांच्या लोकांची ही नाही. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्यावर कोणीही काहीही बोलत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मराठी माणसाचे योगदान असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. ईडीची भीती दाखवून आमच्या नेत्यांना छळत आहेत. मात्र, मूळ मुद्दे सोडून महागाईचा चटका ज्यांना बसतो, त्यावर कोणी बोलत नाही. भाजप आणि मोदींकडून चुकीच्या पद्धतीने लोकशाहीची हत्या करताना पाहायला मिळतेय, असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला.

नागपंचमी हा आपला सण आहे. घरोघरी पुरण-पोळी करतात, नागोबाची पूजा करतात. जागोजागी महिला झोका बांधून खेळ खेळतात. पण, महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे, त्यामुळे कुठेतरी त्याची खंत वाटते. आज पुरणपोळी बनवताना दहादा विचार करावा लागतो. कारण, सर्वांवर महागाईचा डोंगर कोसळला आहे. सर्व किराणा वस्तू महाग झाल्या आहेत, त्यामुळे दहा वेळा विचार करावा लागतो की आज पुरणपोळी कशी बनवायची, असा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की देशात फक्त भाजपच राहणार. बाकी सर्व प्रादेशिक पक्ष आम्ही संपवणार आहोत. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा देखील म्हणाले होते की शिवसेना को हमे जडसे खतम करना है. आज त्यांचा छलकपट, कट होताना दिसत आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी नड्डा आणि शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या