कुर्डूवाडी : माढा येथील शिवाजी नगरमधील रहिवासी व सध्या मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या तरुण महिला पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन अज्ञात कारणावरून आत्महत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री ११:२३ वाजण्याच्या पूर्वी घडली आहे.स्वाती भगतसिंग घोगरे (वय ३५, रा. शिवाजीनगर, ता. माढा) असे त्या मृत महिला पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला पोलिस कॉन्स्टेबल या माढा येथील शिवाजी नगर येथील घरी राहत होत्या.
सध्या त्या मोहोळ येथील पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. प्रसूतीसाठी सहा महिन्यांपूर्वी रजा घेतली होती. त्यांना पाच महिन्यांचे मूलदेखील आहे. कोणत्या तरी अज्ञात कारणावरून त्यांनी बुधवारी रात्री ११:२३ वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी लागलीच येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु, त्यापूर्वीच त्या मृत झाल्या होत्या. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत पोलिसांत खबर दिली असून, तपास पोलिस कॉन्स्टेबल बोराडे करीत आहेत.