सोलापूर : मंडपाचे साहित्य भरलेल्या ट्रॉलीमध्ये बसवून १५ वर्षांच्या मुलाला घेऊन जात असताना ट्रॉली उलटून त्यातले साहित्य अंगावर पडल्याने पंधरा वर्षांचा गणेश अंबादास मालगुंडी (रा. लक्ष्मी नगर, नक्का वस्ती जवळ) या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ललिता अंबादास मालगुंडी (३६, रा. लक्ष्मी नगर) यांच्या फिर्यादीवरून ट्रॉली चालक तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी ललिता यांचा मुलगा गणेश याला आरोपी मोहन नामदेव मेरगू (२१, रा. लक्ष्मी नगर, रा. नक्का वस्ती) हा ट्रॉलीमध्ये बसवून शुक्रवारी सकाळी नऊ
वाजण्याच्या सुमारास जात होता. मोहन याने ट्रॉली बेदरकारपणे गाडी चालवीत. मंडपाचे साहित्य दोरीने व्यवस्थित न बांधता रस्त्याचा अंदाज न घेता चालवीत, पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात ट्रॉली नेल्याने ट्रॉली एका बाजूला झुकली. यात गणेश हा खाली पडला. त्याच्यावर ट्रॉलीमध्ये बांधलेले मंडपाचे साहित्य पडले. त्यामुळे त्याला जखमी अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ललिता मालगुंडी यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन मेरगू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.