सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील निराळे वस्ती रोडवर असलेल्या कै. अण्णासाहेब पाटील शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या दुचाकी तीनचाकी वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमध्ये घरगुती गॅस टाकीचा अचानक स्फोट होऊन चार दुकाने जळून खाक झाली.
हा प्रकार शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला. शॉपिंग सेंटरमध्ये दुचाकी, तीनचाकी वाहनांची दुरुस्ती व वेल्डिंगचे दुकान आहे. दुकानात गॅसच्या टाक्या होत्या, पहाटे अचानक स्फोट झाला अन् दुकानाला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच तेथून जाणार्या सुरज बंडगर यांनी अग्निशामक दलाला संपर्क केला. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तीन गाड्या पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारीही दाखल झाले. आग विझवल्यानंतर तेथील चार दुकाने जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले. जळालेल्यांमध्ये दीपक लोटके यांचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान, फय्याज मुल्ला यांचे गॅरेज, ज्ञानेश्वर गवळी व आदलिंगे यांचे व अन्य दुकान असल्याचे लक्षात आले.
दुकानासह दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान आहे. गॅसचा स्फोट कसा झाला? याचा तपास पोलीस करीत आहेत. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.