वैराग : रुई-नागोबा चौक दरम्यान ६ जून रोजी पती-पत्नीला लुटण्याचा प्रकार घडला. तसेच त्याच दिवशी भालगाव येथेही घरफोडी झाली होती. याबाबत वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर वैराग पोलिसांनी तपासादरम्यान पाच आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सोमवार, ६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी सुहास नागनाथ मंडलिक हे पत्नीसह लासुणा (ता. जि. उस्मानाबाद) येथून नातेवाइकांचे लग्न उरकून रुईमार्गे कळमणकडे मोटारसायकलवरून निघाले होते. दरम्यान, नागोबा चौकातून रुईकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरट्यांनी मोटारसायकल अडवली. त्यांनी दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून ते फरार झाले. यानंतर दाम्पत्याने वैराग पोलीसात धाव घेतली.
तसेच त्याच दिवशी रात्री भालगाव येथील फिर्यादी हणुमंत काशीनाथ कराड (रा. भालगांव) याचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख १६ हजार रुपये पळविले. याबाबत वैराग पोलिसात नोंद झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करत चोरट्यांची माहिती मिळाली. वैरागचे पोलिस निरीक्षक विनय बहीर आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. सचिन नंदू काळे, पप्पू अंबरूषी काळे, लखन नंदू काळे, सागर जयराम भोसले, रुषीकेश जयराम भोसले (रा. तुळजापूर) अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या कारवाईत एक तोळा सोन्याचे गंठण, एक तोळा सोन्याची बोरमाळ, तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, एक ग्रॅम नथ व रोख रक्कम ३८९० रुपये असा एकूण ९९,८९० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.