करमाळा : पत्र्याच्या शेडमध्ये अँगलला लोंबकळू नको म्हणणाऱ्या आजोबाला विरोध करत मला उंच व्हायचंय म्हणत हट्ट करणाऱ्या पाच वर्षांच्या नातवाचा त्याच अँगलवर सापाने दंश केल्याने मृत्यू झाला.
कोळगाव येथे पाच वर्षांच्या मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
अर्णव सचिन माने (वय ५, रा. कोळगाव, ता. करमाळा) असे मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव असून गुरूवार ३ जून रोजी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली.
अर्णव हा मामाच्या मुलांबरोबर घरापासून काही अंतरावर शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता. खेळता खेळता तो शेडमधील अँगलला लोंबकळत होता. तो ज्या अँगलला लोंबकळत होता त्याच्याच वर साप होता. तो त्याच्या निदर्शनास आला नाही. तो लोंबकळत असताना त्याला आजोबांनी पाहिले आणि लोंबकळू नको म्हणाले, याला विरोध करीत तो लोंबकळत राहिला आणि इतक्यात सापाने त्याला दंश केला.
सर्पदंशानंतर तो घाबरुन घरी आला आणि आजोबाला त्याने सांगितले. नातेवाईकांनी त्याला तत्काळ करमाळा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला अकलूज येथे नेले; मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर कोळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. नातेवाईकांनी त्याला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. माने कुटुंबीय हे कोळगाव येथे राहतात.