सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबीचिंचोळी शिवारातील खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तीन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तत्कालीन तलाठ्यास पाच वर्षे सक्तमजुरी व चार हजार दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी ठोठावली.
रामकिसन पंडितराव किन्हाळकर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या लिंबीचिंचोळीच्या तत्कालीन तलाठ्याचे नाव आहे. यातील तक्रारदाराने लिंबीचिंचोळीत खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तलाठी किन्हाळकर याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे संपर्क साधला. पथकाने लाचेचा सापळा लावला होता. त्यामध्ये तलाठी किन्हाळकर यास लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. किन्हाळकर याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी करून किन्हाळकर याच्याविरुध्द विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश पांढरे यांच्यासमोर झाली. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे अॅड. अल्पना कुलकर्णी तर आरोपीतर्फे अॅड. अश्विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार सायबण्णा कोळी, बाणेवाले, घुगे, नरोटे यांनी काम पाहिले.