सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील शेळगी व हिप्परगा येथील चार बेकायदा खडी क्रशर बंद करण्यात आले आहेत. उत्तर तहसील कार्यालयाच्या पथकाने खडी क्रशरची पाहणी केली. त्यानंतर वीज कनेक्शन कापले, त्यानंतर वीजपुरवठा होणाऱ्या मीटरच्या खोलीला सील केले.
शेळगी व हिप्परगा परिसरात बेकायदा खडी क्रशर असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी दिव्या वर्मा यांनी मंगळवारी मात्र खडी क्रशर सुरूच अचानक भेट देऊन पहाणी केली होती. पहाणीदरम्यान त्यांनी कागदपत्रांची व परवान्यांची विचारणा केली, तेव्हा मालकाला योग्य उत्तर देता आले नाही. खडी क्रशरचा पंचनामा करून सील करण्याचे आदेश उत्तर सोलापूर तहसीलदारांना दिले होते. आहे. आदेशाप्रमाणे गुरुवारी दुपारी ३ वाजता उत्तर तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी सुखदेव पाटील, दोन तलाठी, दोन कोतवाल हे पथक प्रथमतः शेळगी परिसरातील खडी क्रशरजवळ गेले. यलप्पा मुधोळकर यांच्या खडी क्रशरचे मीटर असलेल्या खोलीत गेले, तेथील वीज कनेक्शन बंद केले. खोली बाहेर येऊन कुलूप लावले व त्याला सील केले.
पथक पुढे हिप्परगा परिसरात गेले तेथे त्यांनी यलप्पा मुधोळकर यांच्याच दुसऱ्या खडी क्रशरची पहाणी करून त्यालाही सील केले. हिप्परगा परिसरातच श्याम निंबाळकर यांचे बेकायदा खडी क्रशर सुरू होते, त्यांच्या मीटरचे वायर कापून त्याला सील केले. राजू बंदपट्टे यांच्या क्रशरलाही भेट दिली अन् त्यांनी तेथील क्रशरच्या मशीनला सील केले. दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन तासात चार क्रशर सील करण्याची कारवाई झाली. बेकायदा खडी क्रशरवर यापूर्वीही काही वेळा संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून दंडात्मक कारवाया झाल्या आहेत. क्रशर सील करण्यात आले होते, असे असतानाही पुन्हा त्या सुरु करण्यात आल्याचे दिसून येत आहे.