प्रतिनिधी/सोलापूर
अनेक व्यापा-यांकडून सोन्याच्या दागिने बनवून घेण्याचे ऑर्डर घेऊन दागिने बनवून न देता १६ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी असिफ बशीर शेख (वय-३७,रा.हाजी, हजरत खान चाळ,फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या बाजूला सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सरफराज सलाउद्दीन काझी (वय-२५,रा.फुरफुरा, शरीफ,काझीपाडा, जि.होगली, राज्य-पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांचे अरमान ज्वेलर्स नावाच्या सोन्या-चांदीचे दुकान सिद्धेश्वर पेठ येथे आहे.फिर्यादी यांच्या दुकानात लागणारे दागिने हे सन २०१८ पासून ४४९ बाबा कॉम्प्लेक्स सराफ बाजार पूर्व मंगळवार पेठ सोलापूर येथे राहणारा सरफराज याच्या कडून बनवून घेत असतात.दि.२९ एप्रिल २०२२ रोजी फिर्यादी व फिर्यादीचा मेव्हणा असे मिळून सरफराज याच्याकडे जाऊन सोन्याचे नेकलेस बनवण्याकरिता ऑर्डर दिली होती.परंतु त्याने ऑर्डर घेऊन देखील दिलेली ऑर्डर बनवून दिली नाही.व त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही व त्याच्या दुकानाला कुलूप लावले होते.तसेच फिर्यादी यांनी इतर सराफ व्यवसायिक यांच्याशी संपर्क साधला असता जसीमुद्दीन सुराबुद्दीन मल्लीक (वय-३९,रा.पूर्व मंगळवार पेठ सोलापूर) यांनीदेखील वरील संशयित आरोपी सरफराज याला दि.२८ एप्रिल रोजी सोन्याचे बांगडी बनवण्याकरिता ऑर्डर दिली होती.
तसेच सोपान अशोक मंिहद्रकर (व्यवसाय-सराफ,अंकिता ज्वेलर्स चौपाड पोस्ट ऑफिस समोर) यांनी देखील दि.१ एप्रिल रोजी लक्ष्मी हार बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती.मात्र वरील सर्व सराफांची ऑर्डर घेऊन सोने व दागिने बनवून न देता विश्वास घात करून १६ लाख ३२ हजारांचा अपहार करून फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून तपास पोसई ताकभाते हे करीत आहेत.