पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुखदर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून शनिवारपासून दिवसभरात ३ हजार भाविकांना मुख्य दर्शनासाठी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच दररोज पंधरा तास ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांची दर्शन बारी सुरू राहणार आहे. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
याबाबत विठ्ठल मंदिर समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे. की कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या सूचनांनुसार भाविकांना दर्शनसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी भाविकांसाठी दोन दिवस श्रीविठ्ठलाचे दर्शन बंद ठेवण्यात आली होते.गुरुवारी मंदिर समितीने दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शुक्रवारी भाविकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याने उद्यापासून दररोज तीन हजार भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे.
यामध्ये दहा वर्षाखालील बालके, गर्भवती महिला आणि ६५ वर्षावरील पुरुष व महिलांना वगळता इतरांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तासाला दोनशे भाविकांना ऑनलाईन बुंिकग केल्यानंतर दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता दर्शन १५ तास सुरू ठेवून ३ हजार भाविकांना दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन बुकींग करून दर्शनाला यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक