मोहोळ : पत्नी नांदायला येत नाही म्हणून वैफल्यग्रस्त झालेल्या नवऱ्याने चक्क पोलिस ठाण्याच्या परिसरातच असलेल्या भिंतीला डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले. सोमवारी (५ जून) दुपारी तीनच्या सुमारास कामती पोलिस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. शशिकांत हरिदास गुंड (वय ३६, रा. शिवणी, ता. मोहोळ) असे जखमी तरूणाचे नाव आहे. शशिकांतची पत्नी सध्या माहेरी राहत आहे. तिला नांदायला आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले; परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. कौटुंबिक कारणातून त्याची पत्नी नांदावयास येत नसल्याने तो तणावाखाली होता.
सोमवारी दुपारी कामती पोलिस ठाण्यात गेला होता त्यावेळी त्याने परिसरातील भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने सारेच अवाक झाले. तेथील पोलिसांनी शशिकांतवर कामती येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारा शशिकांत स्वतः शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल झाल्याची नोंद आहे.