30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeसोलापूरशासकीय अधिकारी लाचखोरीत अव्वल

शासकीय अधिकारी लाचखोरीत अव्वल

एकमत ऑनलाईन

सोलापूर : शासकीय नोकरीसाठी संघर्ष करून नोकरी मिळाली, ५० हजार ते एक लाखापर्यंत पगार असतानाही शासकीय विभागांमधील लाचखोरी बंद झाली नाही, हे विशेष. जानेवारी ते २९ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरातील ७४३ गुन्ह्यांमध्ये एक हजार २१ जण लाचखोरीत अडकले आहेत.

लाचेत अडकल्यानंतर स्वत:बरोबरच मुलांना, कुटुंबीयांना समाजात ताठ मानेने वावरता येईल का, याचा सर्वांनीच विचार करून नववर्षात भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प करून सर्वसामान्यांच्या कामांची अडवणूक करणार नाही, याची शपथ घेण्याची आवश्यकता आहे.

दरवर्षी महसूल, पोलिस यासह स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर काही विभागातील (ज्या ठिकाणी लोकांचा वावर अधिक तेथे) अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत अडकतात. गुन्हा दाखल होऊन जामीन मिळतो, पुन्हा शासकीय सेवेत त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत घेतले जाते. मात्र, लाच घेण्यापूर्वीची त्या अधिकारी, कर्मचाऱ्याची कार्यालय, समाज व कुटुंबातील पत आणि लाचेत अडकल्यानंतरची किंमत, यात खूपच तफावत आढळते. माझे वडील, आई, माझा मुलगा, भाऊ शासकीय सेवेत असल्याचे ताठ मानेने सांगणाऱ्या त्या कुटुंबीयांची मान शरमेने झुकते.

लाखोंच्या पगारात सर्वकाही सुरळीत सुरू असतानाही अनेकजण काही हजारांसाठी कायमची बदनामी स्वीकारतात, हे विशेषच. आपल्या कुटुंबीयांसह स्वत:चा रुबाब कायम टिकावा, यासाठी लाच न घेण्याची शपथ मनापासून घ्यावी; जेणेकरून त्यांची पुढची पिढी तशीच आदर्श घडेल, हे निश्चित. दरवर्षी राज्यभरात सरासरी सातशे गुन्हे दाखल होतात आणि त्यात एक हजारजण अडकतात. त्यात पोलिस व महसूल हे दोन विभाग अव्वल असल्याची स्थिती मागील पाच-सहा वर्षांपासून कायम आहे. न्याय देणारेच लाच घेऊन अन्याय करत असतील तर भविष्य कठीणच आहे.

यंदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात ७४२ गुन्हे दाखल करीत एक हजाराहून अधिक जणांना अटक केली. त्यात महसूल विभागातील २३६ तर पोलिस विभागातील २२४ अधिकारी, कर्मचारी आहेत. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी प्रशासनात आल्यानंतर लवकर श्रीमंत होऊन सर्व सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात, या हव्यासापोटी अनेकजणांनी लाच घेतल्याचे अनेकदा समोर आले आहे. पण, प्रामाणिकपणे सेवा करावी, शेवटी जग सोडताना काहीच घेऊन जायचे नसते, ही जाण सर्वांनी ठेवावी. लाचेच्या कारवाईत पुणे, नाशिक व औरंगाबाद हे तीन विभाग नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. ही बदनामीची ओळख पुसून टाकायला हवी.

कायदेशीर काम नियमानुसार होत असतानाही जाणीवपूर्वक सर्वसामान्यांची अडवणूक केली जाते. लाच घेणे व देणे गुन्हा असून, लाचेची कोणी मागणी करत असल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. लाचेत अडकल्यानंतर उत्पन्नाशिवाय कमावलेली सगळी संपत्ती जप्त केली जाते. ‘लाचखोरीमुक्त महाराष्ट्र’ची सर्वांनीच शपथ घ्यावी.असे , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या