सोलापूर : तू भिकाऱ्याची मुलगी आहे, असे म्हणत पत्नीचा वारंवार मानसिक छळ करत त्रास दिल्याप्रकरणी पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सादिया अझहर सय्यद (वय १९, रा. पाटील वस्ती, जुना पुना नाका) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सादिया सय्यद यांचा मागील वर्षी आरोपी पती अजहर अमित सय्यद याच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर सय्यद कुटुंबीयांनी सादिया यांना चांगले नांदविले. त्यानंतर त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यात सादिया यांना वारंवार तू भिकाऱ्याची मुलगी आहे, माहेरून पैसे का आणत नाहीस, तुझ्यापेक्षा दुसरी मुलगी केली असती तर तिने पैसे आणले असते, असे म्हणत मानसिक त्रास देत होते. शिवाय आमच्या मुलाला सोडून दे, आम्ही मुलाचे दुसरे लग्न करतो, असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ करत होते. सोबतच माहेरून दोन लाख रुपये घेऊन
ये असे म्हणत अन्नपाण्याविना घरात कोंडून ठेवले, अशा आशयाची फिर्याद सादिया सय्यद यांनी दिली आहे.
या फिर्यादीवरून आरोपी पती अजहर सय्यद, इनयातबी अमीर सय्यद, मासमि अमीर सय्यद, शब्बो अमीर सय्यद, शबुक्ता अमीर सय्यद, तहसिन अमीर सय्यद, चाँदवेगम अमीर सय्यद, शमा अमीर सय्यद (सर्व रा. रंजनखेळी, बिदर, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस नाईक कसबे करत आहेत.