सोलापूर : नाशिकच्या कंपनीला मोठे टेंडर मिळाले असून सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला मी सब कॉन्ट्रॅक्ट देतो असे सांगून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनाथ विलास पाटोळे (वय ३४, रा. मेन रोड मोडनिंब, ता. माढा), निखिल विजयानंद अहिरराव (२७, रा. श्री लक्ष्मीनिवास सी विंग पूजा विहार विद्यानगर, मखमलाबाद रोड, पंचवटी नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निखिल सुधाकर सरवदे ( वय ३० रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ) व सोमनाथ पाटोळे यांची ओळख होती. पाटोळे याने एमएसईडीसीएलचे प्रीपेड इलेक्ट्रीसिटीचे मोटर बसविण्याचे निखिल अहिरराव याच्या इन्स्पायर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नाशिकला टेंडर मिळाले आहे, असे सांगितले. सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला सब कॉन्ट्रॅक्ट देतो त्यासाठी १५ लाख रुपये लागतील, असे म्हणाला होता. सब कॉन्ट्रॅक्ट या विषयावर निखिल सरवदे व निखिल
अहिरराव या दोघांमध्ये फोनवर बोलणे झाले. विश्वास निर्माण झाल्याने निखिल सरवदे याने दि. ७ फेब्रुवारी २०२२ ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान वेळोवेळी बँकेच्या खात्यावर १२ लाख रुपये पाठविले, तर तीन लाख रुपये रोख स्वरूपात दिले. पैसे भरूनही सब कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही,
पैसे दिल्यानंतर जुलै २०२० अखेरपर्यंत मीटर तुमच्या ताब्यात येईल आणि कागदपत्रांची पूर्तता होईल, असे सांगितले, मात्र, जुलैअखेरपर्यंत काम मिळाले नाही, विचारणा केली असता, नोव्हेंबर २०२० पर्यंत मिळेल, असे सांगण्यात आले. पुढे जाऊन नोव्हेंबर २०२१ पर्यंत टाळाटाळ करून अखेर निखिल अहिरराव याने कॉन्ट्रॅक्ट शासनाने रद्द केले असल्याचे सांगितले. त्यामुळे पैशाची मागणी केली असता टाळाटाळ होऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तपास दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख करीत आहेत.