मोहोळ : मोहोळ तालुक्यातील आठ मंडल कार्यालयाच्या क्षेत्रांत १३८ मिलिमीटर पाऊस वादळी,वारा व विजेच्या कडकडाटासह झाला आहे. पावसाची एकूण सरासरी १७.२८७५ मि.मी. असल्याची माहिती मोहोळ तहसील कार्यालयाने दिली. यंदाच्या उन्हाळ्यात तापमान ४३ अंशाच्या पुढे गेले असल्याने मे महिन्यातील कडक उन्हाचे जीवघेणे चटके नागरिकांना सोसावे लागले. उन्हाच्या तीव्रतेमुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे विज खंडित होत होती. त्यामुळे वीज बिल भरूनही जीवघेणा उकाडा सहन करावा लागत होता. पश्चिम बंगालच्या महासागरात मोसमी पूर्व पावसाचे वातावरण तयार होऊन पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे ढग फिरू लागले.
त्यामुळे मोहोळ तालुक्यात गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ते रात्रभर मोहोळ तालुक्याच्या विविध भागात. वादळी वा-यासह दमदार पाऊस झाला. एकुण १७.२८७५ मिलीमीटर पावसाची नोंद, मोहोळ तालुक्यात ८ मंडलमधे झालेल्या मंडल निहाय पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये कामती(४३)वाघोली(३८) मोहोळ(१९)सावळेश्वर(१२) पेनुर(१२)टाकळी सिकंदर (६.३)नरखेड(६)शेटफळ(२) असे एकूण आठ मंडला क्षेत्रात एकूण १३८.३ मिलिमीटरची नोंद मोहोळ तहसील कार्यालयात झाली.तालुक्यात पावसाची एकूण सरासरी १७.२८७५ मिलिमीटर नोंद झाली आहे. अनगर मंडलमधे पावसाची नोंद झालेली नाही. गुरुवारच्या वादळी वारा व मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने तालुक्यात कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु या रोहिणी नक्षत्राच्या पावसाने कृषी क्षेत्राला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे व तसेच बागायती पिकांना हीमोठा आधार झाला आहे.