सोलापूर : हिंदूंवर होणार्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी जयभवानी प्रशालेचे मैदान, भवानी पेठ, सोलापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते . बापूसाहेब ढगे, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक सत्यनारायण गुर्रम, सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी उपस्थित होते.
राजन बुणगे पुढे म्हणाले, या सभेत सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्ह्यात विविध विषयांवर निवेदन, आंदोलन, धर्मशिक्षणवर्ग या माध्यमातून जनजागृती चालू आहे. सभेच्या निमित्ताने मागील एक महिन्यापासून सोलापूर शहरासह आजूबाजूच्या ७५ गावांमध्ये प्रसार चालू आहे. विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत, तसेच भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलकलेखन, रिक्शा फ्लेक्स, सोशल मिडिया अशा विविध माध्यमांतून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. या हिंदु राष्ट्र जागृती सभेसाठी समस्त हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन . राजन बुणगे यांनी या वेळी केले.