पंढरपूर : प्रस्तावित पंढरपूर कॅरिडॉर अंतर्गत चंद्रभागेच्या काठावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाडा बाधित होणार असून सदर वास्तुचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व लक्षात घेवून त्याचे नुकसान करू नये अशी सूचना पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. याबाबत होळकर वाड्याचे व्यवस्थापक आदित्य फत्तेपूरकर यांनी माहिती दिली असून कॅरिडॉर विरोधामधील हे एक मोठे यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्याअंतर्गत महाव्दार पोलीस चौकी ते महाव्दार घाट पर्यंत रूंदीकरण सुचविण्यात आले आहे. या रूंदीकरणामध्ये तसेच प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये अडीचशे वर्षापूर्वीच्या होळकर वाड्यातील राम मंदिर, हनुमान मंदिर देखील बाधित होणार आहेत. यास अनेकांनी कडाडून विरोध केला. होळकर वाड्याचे व्यवस्थापक फत्तेपूरकर यांनी देखील आक्षेप घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागास सदर वास्तू विषयक सविस्तर माहिती देत तो बाधित होवू नये यासाठी निवेदन दिले होते.