सोलापूर : चोरीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करतो म्हणून चक्क होमगार्डने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील दहा हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दत्तात्रय अण्णाराव मोरे (रा. नांदगाव, ता. मोहोळ) याला रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराला नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी लाच मागितली आणि चहा कॅन्टीन चालकाकडे लाचेची रक्कम ठेवायला सांगितल्याप्रकरणी पांगरी (ता. बार्शी) पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलिस अंमलदार सुनील बोदमवाड या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. दोन्ही संशयित अजूनही न्यायालयीन कोठडीत असून त्यांचा तपास सुरू असतानाच बुधवारी (ता. १८) मोहोळ पोलिस ठाणे परिसरात ‘साहेबांना द्यावे लागतात’ म्हणून तक्रारदाराला जामिनासाठी मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना होमगार्डला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. आठ दिवसांत ही ग्रामीण पोलिसांवरील दुसरी कारवाई आहे.
तक्रारदाराला जामिनासाठी मदत करतो म्हणून होमगार्डने पहिल्यांदा १५ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले आणि त्याच दिवशी (बुधवारी) रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार श्री. पकाले, श्री. घुगे व श्री. मुल्ला यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. संशयित आरोपी होमगार्ड दत्तात्रय मोटे याला उद्या (गुरुवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, त्याच्याविरूद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामिनासाठी मदत करतो, साहेबांना त्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणून होमगार्डने मध्यस्थीची भूमिका निभावली. पण, तक्रारदाराने त्यासंबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास लाचलुचपतचे अधिकारी पोलिस ठाण्याच्या परिसरात दबा धरून बसले होते. त्याचा काहीच अंदाज त्या होमगार्डला आला नाही. दहा हजारांची लाच घेताना होमगार्डला रंगेहाथ पकडले. परंतु, होमगार्ड चोरीच्या गुन्ह्यातील त्या संशयितापर्यंत पोहचलाच कसा, त्या तक्रारदाराबद्दल माहिती कशी मिळाली, तक्रारदाराला जामिनासाठी नेमके कोण मदत करणार होता, होमगार्ड कोणाचा वसूलदार आहे, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.