22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeसोलापूरहजारो भाविकांच्या उपस्थीतीत होम प्रदीपन सोहळा

हजारो भाविकांच्या उपस्थीतीत होम प्रदीपन सोहळा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सम्मती कट्ट्यावर शनिवारी अक्षता सोहळा पार पडल्यानंतर होम प्रदीपन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी रात्री होम मैदानावर झाला. या विधीसाठी बाजरीच्या पेंढ्यापासून प्रतिकात्मक कुंभारकन्येला सजविण्यात आले होते. धार्मिक विधी झाल्यानंतर अग्नीनं होम प्रज्ज्वलित करण्यात होमकुंडातून ज्वाला प्रकटल्या अन् हरे बोला.. हरे’चा जयघोष झाला. हजारो भक्तांनी हा सोहळा अनुभवताना मकर संक्रांतीचा उत्सवही साजरा केला.

रविवारी सायंकाळी ५ वाजता मानकरी हिरेहब्बू आणि मानकरी देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांचे पूजन झाले आणि मिरवणूक होम मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाली. हिरेहब्बू वाड्यापासून निघालेली मिरवणूक बाबा कादरी मशीद, दाते गणपती, राजवाडे, चौक, दत्त चौक, सोन्या मारुतीहून जुन्या चावडीजवळ आली. तेथे मानाच्या पहिल्या नंदीध्वजास नागफणा, तर अन्य सहा नंदीध्वजांना बाशिंग बांधण्यात आले.

त्यानंतर नागफणा बांधणारे आणि नंदीध्वज उचलून देणाऱ्या मास्तरांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. माणिक चौक, विजापूर वेस, मार्कंडेय मंदिर पंचकट्टा, सिद्धेश्वर प्रशाला, मार्केट पोलिस चौकीमार्गे सातही नंदीध्वज मिरवणुकीने होम मैदानावरील होमविधीच्या स्थळी आले. त्यानंतर होम विधीचा कार्यक्रम झाला. होमविधीचा कार्यक्रम आटोपताच सातही नंदीध्वजांची होमकुंडास प्रदक्षिणा झाली. प्रदक्षिणेत मानकरी हिरेहब्बूंसह भक्तगणही यात सामील झाले होते. पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मिरवणुकीने सातही नंदीध्वज भाकणुकीसाठी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाकडे मार्गस्थ झाले. बाजरीच्या पेंढ्यापासन कुंभारकन्या प्रतिकात्मक उभी करण्यात आली.

प्रतिकात्मक कुंभारकन्येला शालू नेसवण्यात आला. गळ्यात मणीमंगळसूत्र, हातात बांगड्या, पायातील बोटात जोडवेही घालण्यात आले. डोक्यावर दांडा आणि गळ्यात हार घालण्यात आला. प्रतिकात्मक कुंभारकन्येची पूजा आणि आरती झाल्यावर मानकरी सागर हिरेहब्बू यांनी होम प्रज्ज्वलन केले. त्यावेळी हजारो भाविकांच्या मुखी ‘बोला, बोला एकदा भक्तलिंग हरे बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जय चा जयघोष सुरू झाला.

नागफणा बांधलेला पहिला नंदीध्वज एकट्यानेच पेलण्याचा मान सोमनाथ मैगाणे यांनी पटकावला. दिवसभर उपवास केलेल्या मेगाणे यानी रविवारी रात्री जुन्या फौजदार चावडीजवळील विधी पार पडल्यावर नागफणा बांधलेला नंदीध्वज उचलला आणि होम मैदानावरील होम प्रदीपन सोहळ्याच्या स्थळापर्यंत एकट्यानेच पेलत आणला. यंदा त्यांचे हे आठवे वर्ष आहे. मानाच्या पहिल्या नंदीध्वजासह अन्य सहा नंदीध्वजांना विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते.

मिरवणूक मार्गावर लावण्यात आलेल्या विद्युत माळा आणि सातही नदीध्वजांवरील विद्युत रोषणाईने शहर उजळून निघाले होते.होम विधीच्या सोहळ्यास पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आमदार विजयकुमार देशमुख, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर बमणी मिरवणूक समितीचे प्रमुख अ‍ॅड. मिलिंद थोबडे, बाळासाहेब भोगडे, चिदानंद वनारोटे, नीलकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ लब्बा यांच्यासह पंच कमिटीचे सदस्य, विविध क्षेत्रांमधील मान्यवर आणि भक्तगण उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या