सोलापूर : सोलापूर ते इंगळगी मार्गावरील होटगी गाव ते होटगी स्टेशन दरम्यानचा रस्ता अतिशय खराब झालेला असून या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. होटगी स्टेशन आणि औज या गाव परिसरात एनटीपीसी वीज निर्मिती प्रकल्प, बिर्ला, झुआरी, चेट्टीनाड कंपनीचे सिमेंट उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने ह्या सर्व कंपन्यांचे कारखाने या परिसरात आहेत.
त्याचबरोबर या परिसरातील अनेक लहान मोठ्या गावांचा सोलापूरशी सोयीचा-जवळचा वाहतुकीचा हा एकमेव मार्ग असल्याने नागरी आणि शेतमालांची वाहतूकही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. सिमेंट कारखान्यांशी संबधित अवजड वाहतूक रात्रंदिवस चालत असून या वाहनांची वाहतूक क्षमता सरासरी प्रत्येकी ३०-४० टनांची असते.
अवजड सिमेंट बल्कर वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण होत असून सध्याच्या रस्त्याच्या गुणवत्तेनुसार सतत या मार्गावर खड्डे पडतात. या मार्गावरून दुचाकीधारकांना, सायकलस्वारांना आणि पादचारी नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेकदा या मार्गावरील खड्डयामंध्ये फसलेल्या सिमेंट बल्कर समान वाहनांच्या नादुरुस्तीने रस्त्यांवर अडथळा निर्माण होऊन चक्का जाम होत आहेत. तरी होटगी गाव ते होटगी स्टेशन, औज गाव या मार्गाचे रुंदीकरण करून सदर रस्ता सिमेंट काँक्रेटीकरण करणे गरजेचे आहे.
तत्पूर्वी सदर मार्ग तातडीने दुरुस्त करून परिसरातील नागरिकांचे जीवन सुकर करावे अन्यथा संघटनेच्या वतीने कायदेशीररित्या उग्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येईल याची योग्य ती दखल घेण्याविषयीचे निवेदन मा.कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,सोलापूर यांना देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, उपजिल्हाप्रमुख प्रमोद जगताप, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, तालुका संघटक राजशेखर बोरेगाव, अमित कदम आदीजण उपस्थित होते.