25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरउपमुख्यमंत्री असतो तर राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो

उपमुख्यमंत्री असतो तर राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
कृषी आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र कमालीचा पिछाडीवर आहे .असे असताना राज्याचे कृषी आणि उद्योग मंत्री काय करत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होतो .राज्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असताना रोजगारासाठीचे उद्योग थेट गुजरातला जात आहेत. अशावेळी राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारला सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे. सरकारची ही मस्ती लवकरच उतरणार असल्याचे सांगत ,हे घटनाबा सरकार पडणार म्हणजे पडणार हे लिहून घ्या, अशा शब्दात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीकेची झाड उठवली. सोलापुरातील प्रभाग क्रमांक १० मधील देगांव येथील शिवसेना शाखा कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

राज्यातील अनेक तरुण सध्या बेरोजगार असताना राज्यातील हे खोके सरकार आल्यापासून अनेक उद्योगधंदे गुजरातला जात असल्यामुळे महाराष्ट्र रिकामा होऊ लागला आहे. पुण्यातील तळेगाव येथे ते प्रकल्प आणणार होते. २ लाख लोकांना यामुळे रोजगार मिळाला असता. परंतु आता प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे बेरोजगार युवक डोक्याला हात लावून बसले आहेत .आपलं सरकार असताना राज्य सुस्थितीत चालू होते .परंतु गद्दारी झाली आणि आपले सरकार पाडले गेले. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मोठा प्रकल्प गुजरातला पाठवला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असताना उद्योग मंत्री नेमके काय करत होते ? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्यामध्ये सध्या घटनाबा सरकार बसले आहे . हे सरकार आपल्याला पळवून लावायचे आहे, असे सांगत सरकार पडणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अजूनही शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. ४ हजार कोटींची मदत देत असल्याची घोषणा आपण ऐकली होती. परंतु प्रत्यक्षात शेतक-यांच्या खात्यावर मात्र अद्याप एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही. विधानभवनाच्या पाय-यावर बसून आंदोलन करूनसुद्धा ओला दुष्काळ सरकारकडून जाहीर झालेला नाही .बीडच्या जिल्हाधिका-यांना दारू विचारणा-या कृषी मंर्त्यांचा ह्लओलाह्व दुष्काळ मिटला .मात्र आपल्या ओल्या दुष्काळाचं काय झालं ? असे सांगत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. समोरील लोकांमधून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा पण समाचार घ्या ? असा आग्रह आला .तेव्हा अशांना जास्तकिंमत द्यायची नाही, म्हणत त्यांचे नाव न घेता आदित्य ठाकरे यांनी त्यांनाही लक्ष्य केले. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. शिवाय त्या खासदारसुद्धा आहेत. हे आपण थोडे बाजूला ठेवूयात. परंतु त्या एक महिला आहेत, एवढे तरी त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते, असेही ते म्हणाले. सरकारमधील अशा वाचाळ मंर्त्यांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची बदनामी होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर,जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, महिला जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय वानकर, विक्रांत काकडे, तालुकाप्रमुख संजय पौळ, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, मुकुंद जाधव, मंगलताई वानकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, विठ्ठल वानकर ,प्रभाकर कोरे यांच्यासह प्रवीण काकडे, संतोष कोरे, मुन्ना पाटील, अमर कस्तुरे ,बाबासाहेब मल्लाडे, दीपक भातलवंडे, विजय वानकर, संतोष कोरे, राजू मोकाशी, इब्राहिम शेख, नाम पवार, गणेश पाटील, योगेश जाधव ,विनोद गायकवाड, श्रीकांत भोईटे, रामभाऊ कांबळे, दौलत बसरगी, विष्णू जगताप, बिट्टू शिंदे, नारायण बचुटे, संभाजी पांढरे, अर्जुन गायकवाड, अन्वर शेख, राजू जोशी, नामदेव कारभारी ,संजय राठोड ,नाईक, कालू अध्यक्ष, प्रशांत गायकवाड, गजेंद्र जावीर, संभाजी बोरकर, बबन चव्हाण, गणेश जगताप, सचिन अंबुरे, संजय शेळके, भारत घुले, राजू पवार, राजू राठोड यांच्यासह शिवप्रकाश रिक्षा व विद्यार्थी वाहतूक संघटनेचे तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या