24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरअक्कलकोटमध्ये रात्रीत गणपती मंदिरासह चार दुकाने फोडली

अक्कलकोटमध्ये रात्रीत गणपती मंदिरासह चार दुकाने फोडली

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : शहरात एकाच रात्रीत एवन चौकातील विजय गणपती मंदिरांसह चार दुकाने फोडून चोरट्यांनी दानपेटील रकमेसह २४ हजारांची रोकड पळविली. सकाळी या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना रविवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत शैलेश राठोड यांनी उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता दुकानदार स्वतःची दुकाने बंद करून घरी गेले होते. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या कारंजा चौकातील शैलेश राठोड यांचे तेलाचे दुकान चोरट्यांनी फोडले. गल्ल्यातील रोख २० हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले, तसेच संजय पुकाळे यांचे जुना पॉवर हाउसजवळील न्यू स्वप्नील एजन्सी किराणा दुकान फोडून २ हजारांची रोकड पळविली. याबरोबरच एवन चौकातील सागर शंकर गंगणे यांचे कोल्ड्रिंक्स दुकान फोडून २ हजार रुपये चोरून नेले, तसेच प्रमिला पार्क एवन चौक येथील विजय गणपती मंदिराचा दरवाजा तोडून आतील गल्ला रिकामा केला. अशा प्रकारे एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीचा प्रकार घडला असून, या घटनेत रोख रक्कम २४ हजारांपेक्षा अधिक रक्कम पळविली आहे. काही दुकानांचे शटर उचकटले आहे, तर काही दुकानांचे कुलूप चोरट्यांनी तोडले आहे.

उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मागील दहा दिवसांपासून दीर्घ रजेवर आहेत. यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांवर दोन पोलीस ठाण्याचा अधिभार पडत आहे. यामुळे तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरासाठी पोलीस अधीक्षकांनी एक सक्षम अधिकारी द्यावा, अशी मागणी तम्मा शेळके, विक्की चौधरी, मल्लीनाथ भासगी, सचिन स्वामी यांनी यावेळी केली. नुकताच झालेल्या चोरी घटनेत दोन दुकाने उत्तर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर आहेत. सकाळी या चारही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात घरफोडीची एकच चर्चा रंगली. मागील दहा दिवसांपूर्वी
अक्कलकोट हद्दवाढ भागात समर्थनगर येथे एकाच रात्रीत अशाच प्रकारे चार दुकाने फोडण्यात आली होती. या घटनांचा तपास होतो न होतो त्याची पुनरावृत्ती घडवून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले. या सगळ्या घडामोडीवर नागरिकांनी पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या