सोलापूर : सोलापूर शहरातील गजबजलेल्या सात रस्ता भागात दुचाकी अडवून ठेकेदाराला मारहाण करून त्याला कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न पुण्याच्या सहा महिलांकडून झाला. परंतु बेगमपेठ परिसरात त्यांना रोखण्यात यश आल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ठेकेदार आकाश काळे (वय- २८, रा. दक्षिण कसबा) हे आपल्या एका सहकार्यासह दुचाकीवरून सातरस्ता येथून निघाले होते. त्यावेळी एक इंडिगो कार त्यांच्या गाडीला आडवी लावण्यात आली. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवली.
तेव्हा कारमधून उतरलेल्या महिलांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना कारमध्ये बसवले आणि कार रंगभवनमार्गे विजापूरवेसच्या दिशेने निघाली. कार बेगमपेठेत आली असता काळे यांचा दुचाकीवरील सहकारी तेथे आला व त्याने आपली गाडी कारला आडवी लावली आणि कार थांबल्यानंतर त्याची चावी काढून घेतली. त्यामुळे महिलांची कार जागेवर थांबली. यावेळी महिलांनी तेथेही गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रस्त्यावर बराच गोंधळ सुरू झाल्याने जेलरोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर त्या महिलांना त्यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी महिला व आकाश काळे यांना सदर बझार पोलिस ठाण्यात आणले. याबाबत रात्री उशिरा सात महिलावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला.
येथील एका तरुणाला पळवून नेऊन मारण्याचा प्रयत्न केला. मोबाईल काढून घेतला. दरोडाप्रकरणी सात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आकाश काळे (रा. दक्षिण कसबाचौपाड) यांनी सदर बझार पोलिसात बुधवारी फिर्याद दिली. प्रियाकाशिनाथ गायकवाड (रा. सय्यदनगर, पुणे), पल्लवी गोड (रा. बिबेवाडी, पुणे), सोनापाटोळे (रामटेकडी, पुणे), कलावती गायकवाड (कोंढवा खुर्द, पुणे), रोहिणी शिंदे (कोथरूड, पुणे), काजल शिंदे (हडपसर, पुणे), विद्यापाटोळे (रा. सेंट्रल हॉल, पुणे) या सात महिलांवर गुन्हा दाखल झाला. कारचा (एमएच १३, ए झेड ४१३१) चालक अजय वाघमारे (रा. पुणे) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. सातही जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी दिली. महिलांनी पोलीस ठाणे आवारातही गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
त्यामुळे पोलिसांना तेथे क्यूआरटी पथकाला बोलवावे लागले. तेथील पोलिसांनी चौकशीला सुरुवात करताच त्यांच्यावर पुण्यातून एका राजकीय पक्षाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. स्थानिक कार्यकर्तेही पोलीस ठाण्यात आले होते. ठेकेदार काळे यांनी त्या महिलांना आपण ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले, त्यामुळे त्यांना मारहाण करून त्यांना पळवून नेण्याचा या महिलांचा नेमका हेतू काय होता, हे समजू शकले नाही. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. कारमधून आलेल्या महिलांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या महिला सोलापुरात कशासाठी आल्या? त्यांचा उद्देश काय असावा ? त्यांची मोठी टोळी आहे का ? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.