29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात वर्षानंतरही कोरोनाचे थैमान कायम

सोलापूर जिल्ह्यात वर्षानंतरही कोरोनाचे थैमान कायम

एकमत ऑनलाईन

सोलापूर (रणजित जोशी ) : वर्षभरापूर्वी सोलापूरात कोरोनाचा प्रवेश झाला आणि सोलापूरकर कोरोनाच्या कराल दाढेत ढकलले गेले. तीन महिन्यांचा कडक लॉकडाउन सोलापूरकरांनी झेलला. शहरातील वाढती रूग्णसंख्या, रोज मृत्यूच्या संख्येत होणारी वाढ, सर्वाधिक मृत्यूदर अशी भयान स्थिती शहराची होती. त्यात खाजगी रूग्णालयांनी सुरूवातीला असहकार पुकारला, प्रशासनाने गुन्हे दाखल करून त्यांना वठणीवर आणले मात्र त्यानंतर अव्वाच्या सव्वा बिले आकारून लुटण्याचे प्रकार घडले.

शासनाला लेखापरिक्षक नेमावे लागले, तीन महिने व्यापार बंद राहिल्याने व्यापारी रसातळाला गेले. लॉकडाउन उठल्यानंतर शहरात काही व्यावसायिकांच्या आत्महत्या झाल्या. एका डान्सबार चालकाने कुटूंबासह आत्महत्या केली. यात बेकायदा सावकारी करणा-या राजकीय धेंडांवर कारवाया झाल्या. सोलापूरातील व्यापार रोजच्या रोज वसुली करणा-या बेकायदेशीर सावकारांच्या चक्रव्यवुहात फसल्याचे चित्र समोर आले. पोलिस खात्याला बेकायदा सावकारांविरोधात विशेष पथक स्थापन करून गुन्हे दाखल करावे लागले. सोलापूरातील व्यापार हा आधीच कुपोषित आहे त्यात लॉकडाउनच्या संकटात तो मृत्यूपंथाला लागला.

बँकेचे कर्ज, ठोक व्यापा-यांचे देणे, लाईटबिल, भाडे हे कमी म्हणून खासगी सावकारांचा हप्ता असे सापळे व्यापा-यांभोवती फास आवळत आहेत. त्यात लॉकडाउनमुळे उत्पन्न बंद मात्र व्यापारांचे खर्च सुरू अशी स्थिती व्यापा-यांची झाली. लॉकडाउनमुळे सोलापुरातील उत्पन्नाचे स्त्रोत आटल्यामुळे त्याचा प्रतिकुल परिणाम व्यापारावर झाला आणि उलाढाल मंदावल्यामुळे नफा ही दिसेनासा झाला अशा गर्तेत व्यापारी अडकले आहेत. त्यात लोकांशी संपर्क असल्यामुळे कोरोनाची भीतीही आहेत. अतिशय बेजबाबदार आणि निर्णयक्षम नसलेले राजकीय नेतृत्व प्रशासनाच्या भरवशावर सोडलेले शहर अशी अवस्था सोलापूरची आहे.

गेल्या वर्शभरापासून शहरातील अनेक उद्योग बंद पडले, दुकाने बंद पडली, व्यापारावर अनिष्ट परिणाम झाल्ग़ त्यातच आता दुसरी कोरोनाची लाट आली असून शहर पुन्हा लॉकाडाउनच्या उंबरठयावर आहे. प्रशासनाने गेल्या काही काळात कोरोना टेस्टींग कमी केल्यनो रूग्ण कमी निघत होते. कॉरंटाईन वगैरे तर बंदच होते, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हते जणू काही कोरोना गेला अशा अविर्भावात सगळे वावरत असताना पुन्हा एकदा शहरात कोरोना थैमान घालू लागला असून आरोग्य व्यवस्थेची विदारक स्थिती पहावयास मिळत आहे. रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, बेड न मिळणे, कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असे चित्र दिसत असून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची अक्षरश: फरफट होत आहे.

स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असून जागा अपुरी पडत आहे. यात शहराला प्रशासनावर वचक ठेवून दिशा देणारे कणखर राजकीय नेतृत्व दिसत नसून पालकमंत्रीही गायब आहेत. प्रशासकीय अधिकारी त्यांच्या वकूबानुसार निर्णय घेत असून खालील यंत्रणेकडून त्या निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने सावळा गोंधळ आहे. तहान लागल्यावर विहिर खणायची या सवयीप्रमाणे प्रशासन प्रश्न निर्माण झाल्यावर त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करते आहे मात्र कोरोनामुळे वर्षभरात शहराचे अर्थचक्र, सर्वसामान्यांचे जीवनचक्र पार कोलमडून गेले आहे. शाळा सुरू नसतानाही खासगी शाळांनी फी घेतली, शासनाने लाईटबिल घेतले, महापालिकेने टॅक्स घेतला यासह सर्व देणी दयावीच लागत असताना उत्पन्न मात्र बंद अशी स्थिती झाल्यामुळे लोकांचे मानसिक संतुलन ढळले असून कौटूंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सामान्य सोलापूरकर अतिसोशिक असून आपल्या हक्काबाबत आवाज उठवण्याची सवय नसल्याने राजकीय नेतृत्वाकडून होणारी शहराची अपेक्षा, प्रशासनाकडून प्रत्येक निर्णय घेण्यास होणारा विलंब, संपलेली कारखानदारी, शहरता न येणारे नवीन उद्योग, संपलेला रोजगार, खुंटलेला विकास, कोरोनाच्या उपचारात होणारी प्रचंड हेळसांड यावर सामान्य सोलापूरकर अवाक्षर काढताना दिसत नाही. शहरात कौटूंबिक हिंसाचार, आत्महत्या, गुन्हेगारी, अवैध व्यवसाय या सर्वासाठी कोरोनाची आणी लॉकडाउनची किनार कारणीभूत आहे याचा विचार कोणत्याही पातळीवर होत नाही. लसीकरणाचा वेग प्रचंड मंदावला असून लसीच्या तुटवडयामुळे लसीकरणात वारंवार खंड पडत आहे मात्र सोलापूरकर चकार शब्द काढत नाहीत. लसीकरण वेगात झाले असते तर लॉकडाउनची वेळच आली नसती, कोरोना प्रतिबंधासाठी सर्वसामान्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढणे ही महत्वाची बाब आहे.

त्यात शासकीय पातळीवरून गेल्या वर्षभरात कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. आर्सेनिक अल्बमच्या गोळया सुरूवातीला काही काळ वाटल्यानंतर कोरोना गेला अशा समजात राहिल्यामुळे शहर जिल्हयात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरात व जिल्हयात मृत्यूचे तांडव सुरू असून पुन्हा शहर जिल्हा लॉकाडाउनच्या उंबरठयावर आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वारंवार लॉकाडाउन करावे लागणे हे व्यवस्थेचे अपयश आहे. मात्र सर्वसामान्य सोलापूरकरांनी आवाज उठवून व्यवस्थेवर अंकुश ठेवला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर शहर जिल्हयाची मदार आहे.

मात्र राजकीय नेते पोटनिवडणूकीत मग्न आहेत. सर्वसामानय सोलापूरकर प्रशासनाच्या भरवशावर सोडून राजकीय नेतृत्व मात्र निवडणुकांमध्ये व्यस्त ही बाब सोलापूरकरांसाठी क्लेदायक आहे. आचारसंहितेचे अवडंबर करून निर्णय घेण्याच्या टाळाटाळीचे परिणाम आज ना उद्या सोलापूरकरांना भोगावे लागणार आहेत. कायदे हे जनतेसाठी असतात मात्र त्यासाठी जनता जीवंत असणे गरजेचे असते हे राजकीय नेतृत्वाने समजून घेणे गरजेचे आहे. कोरोनापेक्षा राजकीय व प्रशासकीय उपेक्षा आणि दिरंगाईचे बळी सोलापूरकर ठरत आहेत याची जाणीव नेतृत्वाने ठेवावी.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या