सोलापूर : सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (दि. ३0) हा प्रकार समोर आला. नंतर दोन्ही मृतदेहांचे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या दोघांच्या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक (६२) आणि दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक (४२, दोघेही रा, शिवगंगा नगर, शेळगी) असे आत्महत्या केलेल्या मायलेकाचे नाव आहे. काल सकाळपासून घरात सामसूम दिसत होते. नेहमी घरापासून ये जा करणा-यांना घरात शांतता दिसत होती. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आत घरात डोकावून पाहिले. त्यावेळी दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत याबाबत नोंद झाली आहे. या दोघांनी आत्महत्या का केली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, मुलगा मतिमंद असल्याने त्याचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे उमादेवी पुराणिक चिंताग्रस्त होत्या या नैराश्यातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जोडभावी पेठ पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.